
२०१९ मध्येच वेधले होते खासदार राजेंद्र गावित यांनी पोलिसांचे लक्ष
प्रतिनिधी
वसई : संचार बंदी आणि लॉकडाउन काळातही गांजाची जोरदार विक्री होत असल्याचे वृत्त आल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष वसई-कोळीवाडयाकड़े वेधले गेले आहे. वसई-कोळीवाडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याचे वृत्त एका स्थानिक वर्तमान पत्राने २५ एप्रिल रोजी दिले आहे. यातून संचार बंदी आणि लॉकडाउन काळातही सामाजिक सुरक्षा आणि अमली पदार्थविरोधी नियमांची कशी पायमल्ली होत आहे, हे स्पष्ट झाले आहे.
वसई-कोळीवाडा आणि परिसरात होत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीला रोख लावावी, अशी विनंती अनेकदा परिसरातील जागरुक नागरिकांनी केली होती; मात्र त्यांकड़े पोलिसांनी दुर्लक्ष केले होते.
श्रीमती कल्पना खरपडे यांनी; २०१९ च्या ऑगस्ट महिन्याच्या ७ तारखेला एका पत्राद्वारे खासदार राजेंद्र गावित यांचेही लक्ष वसई-कोळीवाडा आणि परिसरात होत असलेल्या अमली पदार्थ विक्रीकड़े वेधले होते.
या पत्राची दखल घेत; खासदार राजेंद्र गावित यांनी; १० ऑगस्ट २०१९ मध्ये तातडीने पत्र देऊन वसई पोलीस अधीक्षकांना याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र त्यानंतरही या परिसरातील अमली पदार्थ विक्री थांबलेली नाही. उलट संचार बंदी आणि लॉकडाउन काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याचे स्थानिक वर्तमान पत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे.


