

रमजानच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करण्याची मागणी ?
वसई : लॉकडाउन काळात वसईतील पाचूबंदर दत्तधाम, वाल्मीकी नगर, हाथिमोहल्ला येथील-जामे मंझील आणि कब्रस्तान परिसरात गर्दुल्ल्यांचा हैदोस सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
वसई-पाचूबंदर, दत्तधाम, वाल्मीकी नगर, हाथिमोहल्ला येथील जामे मंझील इमारत आणि कब्रस्तान परिसरात मागील काही दिवसांत गांजा आणि अन्य अमली पदार्थ विक्री होत असल्याने या परिसरात
गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हाथिमोहल्ला येथील जामे-मंझील ही अर्धइमारत तर मागील काही महिने गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. २० ते ३० वर्षांची अनेक मुले या ठिकाणी गांजा आणि अमली पदार्थ सेवनासाठी येत असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
याबाबत नागरिकांनी अनेकदा पोलिसांतही तक्रारी केल्या होत्या; मात्र कारवाई न झाल्याने अद्याप या इमारतीतील गर्दुल्ल्यांचा वावर कमी झालेला नाही.
दरम्यान; रमजान तोंडावर असल्याने या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
…..
अलीकडे या परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण करवाई झालेली नाही. आता तर लॉकडाउन असल्याने गर्दुल्ल्यांच्या कारवायांना जोर आला आहे. गांजा आणि अन्य अमली पदार्थ यांना सहज उपलब्ध होत आहेत. हा भाग मुस्लीमबहुल वस्तीचा आहे. आता रमजान तोंडावर आहे. त्यामुळे अशा उपद्रवी लोकांमुळे सामाजिक सुरक्षेला धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
– तसनीफ़ नूर शेख, सामाजिक कार्यकर्ते, वसई