

सतराव्य लोकसभेत विविध राजकीय पक्षांचे मिळून तब्बल 267 खासदार प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे नव्या लोकसभेत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. निवडून आल्यानंतर खासदार म्हणून प्रत्येक सदस्याला शपथ घ्यावी लागली. खासदारांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी यावेळी सभागृहात घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला. जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माताकी जय, जय हिंद, हर हर महादेव, जय योगी जय मोदी, राधे राधे, अल्ला हू अकबर, जय बांगला, कॉन्स्टिट्यूशन झिंदाबाद अशा घोषणा सदनात ऐकायला मिळाल्या.
एआयएमआयएम चे असिदु्द्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेताना जय भीम, तकबीर, अल्ला हू अकबर, जय हिंद अशी घोषणा दिली. उत्तर प्रदेशातून निवडून आलेल्या बसपच्या बर्क यांनी कॉन्स्टिट्यूशन झिंदाबाद अशी घोषणा दिली. मोरादाबादचे सपाचे खासदार ए. टी. हसन यांनी हिंदुस्थान झिंदाबाद असे म्हटले. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी जय मॉं काली, जय बांगला अशा घोषणा दिल्या. भाजपच्या रवींद्र कुमार यांनी तर जय योगी, जय मोदी अशी गर्जना केली. भाजपच्या मथुरामधून निवडून आलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शपथ घेतल्यावर राधे राधे असा जप केला. महाराष्ट्रातून अमरावती मधून प्रथमच खासदार म्हणून निवडून गेलेल्या नवनीत रवि राणा यांनी शपथ घेतली तेव्हा सदनात जय श्रीराम असा जयघोष झाला , तेव्हा त्यांनी अशा घोषणा देण्यासाठी लोकसभा हे ठिकाण नाही, मंदिरात घोषणा द्याव्यात असे सुुनावले…
महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या बहुतेक खासदारांनी मराठीतून शपथ घेतली ही अभिमानाची बाब आहे. राज्यातून खासदार झालेल्यांनी मराठीतून शपथ घ्यावी अशी काही मराठी प्रेमींनी मोहीम राबवली होती. विशेष म्हणजे एमआयएमचे इम्तियाज जलिल, अपक्ष नवनीत रवि राणा, भाजपचे मनोज कोटक अशा अमराठी सदस्यांनीही मराठीतून शपथ घेऊन महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला. आणखी विशेष म्हणजे पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट, जळगावचे उन्मेष पाटील व भंडारा- गोंदियातून निवडून गेलेले भाजपचे सुनील मेघे या तिघांनी संस्कृतमधे शपथ घेऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
ओरिसामधील क्योंझर जिल्हयातील टिकरगुमुरा गावातील चंद्राणी मुर्मू ही विद्यापीठातून बी टेक केल्यावर नोकरीच्या शोधात फिरत होती. पंचवीस वर्षाच्या या आदिवासी मुलीतली चमक तिच्या काकाने ओऴखली. बिजू जनता दलाच्या कार्यालयात तिला नेले व तेथे नेत्यांबरोबर तिच्या भेटी घडवल्या. बिजू जनता दलाचे नेतेही क्योंझर मतदारसंघातून सुशिक्षित महिला उमेदवाराच्या शोधात होते. चंद्राणीचे आई वडिल हे निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. सतराव्या लोकसभेत चंद्राणी ही सर्वात लहान म्हणजे पंचवीस वर्ष वयाची सदस्य आहे.
केरळमधून कोझिकोड जिल्ह्यातून अलातूर मतदारसंघातून राम्या पी.एम. ही 32 वर्षाची युवती कॉंग्रेसची खासदार म्हणून निवडून आली आहे. तिचे वडिल मजुरी करतात व आई एलआयसी एजंट म्हणून काम करते. ती स्वतः दहावी पास आहे. कॉंग्रेसच्या टॅलेंट हंट प्रोग्रॅमधे राहूल गांधींनी तिच्यातले वेगळेपण ओळखले. तिला पक्षाने उमेदवारी दिली. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तिच्या प्रचार रॅलीवर हल्ला झाला. हाताला प्लॅस्टर बांधून तिने प्रचार चालूच ठेवला. डाव्या आघाडीच्या उमेदवाराचा तिने 1 लाख 58 हजार मतांनी पराभव केला. आपण लोकसभेत खासदार होऊ असे कधी मनातही नसताना चंद्राणी व राम्या सारखे अनेक नवीन चेहरे लोकसभेत पोचले आहेत.
सन 2014 मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत 315 नवे चेहरे खासदार म्हणून निवडून आले होते, तर 2009 मधे झालेल्या निवडणुकीत 302 जण प्रथमच खासदार म्हणून निवडून आले होते. आणिबाणीनंतर 1977 मधे झालेल्या लोकसभेत सर्वाधिक म्हणजे 376 जणांनी प्रथमच लोकसभेत खासदार म्हणून प्रवेश केला होता. यंदाच्या लोकसभेत 221 पुरूष व 46 महिला प्रथमच खासदार झाल्या आहेत.
सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून मोहंमद सादिक ( वय 79 ) हे पंजाबमधील फरिदकोट मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर सर्वात तरूण खासदार म्हणून चंद्राणी मुर्मू ( वय 25 ) या ओरिसातून विजयी झाल्या आहेत. सर्वात श्रीमंत नकुल नाथ ( वय 44, कॉंग्रेस) हे मध्य प्रदेशातून छिंदवाडा येथून निवडून आले असून त्यांची संपत्ती 659 कोटी 31 लाख रूपये आहे. तर गोदेवी माधवी ( वय 28, अराकू, आंध्र प्रदेश ) या सर्वात गरीब असून त्यांच्याकडे केवळ 1 लाख 41 हजार रूपये आहेत. नव्या लोकसभेत 72 टक्के खासदार हे पदवीधर आहेत. 61 टक्के खासदार पदव्युत्तर आहेत. 11 जण डॉक्टरेट आहेत.
इंदुरमधून भाजपचे शंकर लालवाणी व गुवाहटीतून भाजपच्या क्वीन झा हे दहा लाखापेक्षा जास्त मते मिळवून विजयी झाले. लोकसभेतील 92 खासदारांनी 60 टक्केपेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आहे. त्यात भाजपचे 82, डीएमके 3, शिवसेना 3 , कॉंग्रेस 1 व वायएसआर कॉंग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. महाराष्ट्रात उन्मेश पाटील ( जळगाव ), डॉ. श्रीकांत शिंदे ( कल्याण ), राजन विचारे ( ठाणे ), गिरीश बापट ( पुणे ) आणि गजानन कीर्तिकर ( मुंबई वायव्य ) यांनी साठ टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजय मिळवला.
लोकसभेत प्रथमच खासदार म्हणून प्रवेश केलेल्यांमधे गिरीश बापट ( 67, भाजप ) हे पुण्यतून निवडून आले. संघ, विद्यार्थी परिषद, जनसंघ, भाजप असा नगरसेवक ते राज्यात मंत्री असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे. डॉ. अमोल कोल्हे ( वय 38, राष्ट्रवादी कॉंग्रेस ) हे शिरूर मतदारसंघातून निवडून आले. ते एमबीबीएस असून छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजीच्या भुमिकेमुळे ते लोकप्रिय अभिनेते आहेत. हेमंत पाटील ( वय 46, शिवसेना ) हे हिंगोलीतून प्रथमच खासदार झाले. आमदारही होते. ओमप्रकाश निंबाळकर ( 35, शिवसेना ), हे उस्मानाबादमधून पहिल्यांदाच खासदार झाले. त्यांचे वडिल पवनराजे निंबाळकर यांचा राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. इम्तियाज जलिल ( 47, एमआयएम ) औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून निवडून आले. डॉ. सुजय विखे पाटील ( 37, भाजप ) हे घराण्याच्या तिसर्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाले. शिक्षणात ते मास्टर ऑफ सर्जरी ( न्युरोलॉजी ) आहेत. त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन फडणवीस सरकारमधे थेट मंत्री झाले. सुरेश धानोरकर ( कॉंग्रेस ) चंद्रपूर, संजय मंडलीक ( शिवसेना ) कोल्हापूर, सुधाकर शुंगारे ( भाजप ) लातूर, सुनील तटकरे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ) रायगड, जय सिध्देश्वर शिवचारी महास्वामीजी ( भाजप ) सोलापूर, डॉ. भारती पवार ( भाजप) दिंडोरी, रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर ( भाजप ) माढा, प्रताप पाटील चिखलीकर ( भाजप ) नांदेड हे प्रथमच खासदार म्हणून लोकसभेत पोचले आहेत.
नव्या लोकसभेत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, मिलिंद देवरा, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गीते, हंसराज अहिर, दिलीप गांधी, शिवाजीराव आढळराव पाटील, किरीट सोमय्या, अनिल शिरोळे, शरद बनसोडे, धनंजय महाडिक, राजू शेट्टी हे दिसणार नाहीत. भाजपचे पालघरमधून निवडून येणारे चिंतामण वनगा यांचे निधन झाल्याने त्यांचीही अनुपस्थिती जाणवेल.
मोदी सरकार 1 मधे मंत्री म्हणून काम केलेले अरूण जेटली आजारपणामुळे घरी आहेत. उमा भारती, सुषमा स्वराज, यांनी निवडणूकच लढवली नाही. लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी ही वयोवृध्द जोडी नव्या लोकसभेत नाही. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे लोकसभेत दिसणार नाहीत.
———————————————