‘आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे’, हा विजेता होण्यासाठी फॉर्म्युला आपण कायम वाचत आलो आहोत. आपली देहबोली आणि त्याहीपलीकडे आपण विश्वासपूर्वक मांडलेली गणितेच आपल्या यशाचा प्रवास सुकर करते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एखाद्या झंझावाताप्रमाणे पुढे आलेली वंचित बहुजन आघाडी आजही आपल्याभोवतीच राजकीय वलय टिकवून आहे. भाजपाची ‘बी’टीम म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ‘वंचित’ राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेचा गड मानल्या जाणार्‍या औरंगाबादेत एमआएम आणि वंचित बहुजन आघाडीचा पहिला खासदार इम्तियाज जलील यांच्या रूपात निवडून आला. त्याहीपुढे लोकसभा निवडणुकीत 48 जागांवर उमेदवार उभे करणार्‍या आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या ‘वंचित’ला 41 लाख मते पडली. महाराष्ट्रभरात पडलेल्या या मतांची टक्केवारी 41 लाख इतकी आहे. आता तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट निवडणूक आयोगालाच चॅलेंज दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला 1 कोटीहून अधिक मते पडतील. काँग्रेसला आम्ही 144 जागांची ऑफर देतो. काँग्रेसने यावर लवकर निर्णय न घेतल्यास आमचा मार्ग मोकळा, हा आत्मविश्वास ‘वंचित’कडे आला कुठून? 140 वर्षांहून अधिक जुन्या काँग्रेसला गणतीत न धरता त्यांना जागांची ऑफर करण्याइतपत ‘वंचित’ची ताकद आहे का? हा ज्याला-त्याला पडलेला प्रश्न आहे. पण, काँग्रेसचं राज्य आणि देशपातळीवरील संघटन इतक खिळखिळ झालं आहे का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या रणनीतीपुढे काँग्रेसचा कुठेचं निभाव लागत नाही, हे कितपत खरं आहे? यावर खल होताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकर हे सातत्याने काँग्रेसच्या डळडळीत झालेल्या संघटनावर का बोलत आहेत? याहीपुढे आमची लढाई ही भाजपा-आरएसएस आणि शिवसेनेसोबत आहे, काँग्रेससोबत नाही. हे सातत्याने जनमानसात का, रूजवण्याचा प्रयत्न करत आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादीत संस्थानिक म्हणून नावारूपाला आलेले ‘कोहिनूर हिरे’ सहकुटुंब एकमागोमाग एक शिवसेना-भाजपाची वाट धरत आहेत. या नेत्यांचा राजकीय दबदबा आणि जनतेतील त्यांचे स्थान बघून त्यांना आम्ही प्रवेश देत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीयुक्त झालेली भाजपा 2019 ची विधानसभा आम्हीच जिंकणार, हा आत्मविश्वास दाखवत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून बड्या नेत्यांसह त्यांच्या कुटुंबकबिल्याचं आउटगोईंग सातत्याने सुरूच आहे. वंचित सोबत आली नाही, तर आम्हाला फरक पडत नाही! असं काँग्रेस-राष्ट्रवादीत आत्मविश्वासपूर्वक सांगणारा एकही नेता नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागांवर वंचितचा मोठा फटका बसला. मतांच्या आकडेवारीत मोठा फरक पडून शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांचा विजय सोपा झाला. 23 मेच्या निकालानंतर मोदी नावाची सुप्त लाट इव्हीएमच्या कौलातून बाहेर पडली. मोदी लाट असतानाही काल-परवा जन्माला आलेल्या ‘वंचित’च्या लाटेची चर्चा झाली. ही लाट आता ओसरलीय, वंचितमध्ये फाटाफूट झालीय, वंचितला शह-काटशह देण्यासाठी रिपब्लिकन गट, नवी वंचित पार्टी रातोरात उभी केली जाते आहे तरीही मोर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितकडेच का? हा प्रश्न राजकीय विश्लेषकांनाही पडला आहे. याउलट ‘वंचित’च्या जातीनिहाय मतांना फोडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीही जोमाने कामाला लागली आहे. काँग्रेसने तर विविध जातींचे नेतृत्व करणारे पाच कार्यकारी अध्यक्ष नेमले आहेत. त्यानंतरही काँग्रेसला वंचितची का गरज भासते आहे? काँग्रेससोबत तडजोड करण्यासाठी तयार होणारे प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी चा नामोल्लेख का टाळत आहेत? या सर्व प्रश्नाचं उत्तर निवडणूक तोंडावर आल्यानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाऐवजी उद्या कोण कुठं चाललयं, यावरच होणारी चर्चा. सत्ताधारी पक्षात विरोधी पक्षातील आमदार, खासदार दाखल होणे, हा चमत्कार महाराष्ट्राच्या राजकारणात पहिलाच नाही. पण, विरोधकच न उरणे ही भाजपाची रणनीती सफल होणे, हे काँग्रेस-राष्ट्रवादी आणखी कमकुवत होण्याला कारण ठरत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीत किंबहुना शिवसेना-भाजपात वाढलेली कुटुंबशाही आपल्याला फक्त संतरज्या उचलायला लावणार, हा असंतोष ‘वंचित’च्या पर्यायाला मोकळी वाट करून देत आहे.
धनगर, माळी, वंजारी आणि विविध जातीपातींत विखुरलेला 52 टक्के ओबीसी समाज कायमच एकहाती सत्तेची स्वप्न पाहत आलेला आहे. मात्र आम्ही सत्ता मिळवू शकतो, हा त्यांच्यातील ‘वंचितां’नी दिलेला विश्वास आजही वंचितची सुप्त लाट आहे, हे दर्शवतो आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत राहून वषार्र्नुवर्षे सत्तेपासून वंचित राहिलेला हा घटक आता राजकारणात आपले वेगळे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. हा कार्यकर्ता केडरबेस आणि प्रशिक्षित नसला तरी सोशली, फे्रंडली, सामाजिक बांधिलकीच्या रूपात मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आगामी विधानसभेत महाराष्ट्राच्या राजकारणात ‘वंचित बहुजन आघाडी’ कितपत प्रभाव पाडेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. कारण राजकारणात अंदाज बांधणे नेहमीच खरे ठरत नाही.
..
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव टाकला, हे मतांची आकडेवारी दर्शवते. परंतु, वंचितचा प्रभाव आता खरोखरचं ओसरला आहे का? काँग्रेसला 144 जागांची ऑफर देण्याएवढं बळ वर्षभरापूर्वी जन्माला आलेल्या काँग्रेसला नेमकं कुठून आलं? राष्ट्रवादी ‘वंचित’च्या गणतीतही का नाही, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
…………………..
राज्यात 48 लोकसभा मतदारसंघ येतात. त्यातील प्रत्येक मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील अनेक मतदारसंघात ‘वंचित’च्या पारड्यात मोठ्या प्रमाणावर आणि निर्णायक मते पडल्याने लोकसभेचे निकाल धक्कादायक होते. काँग्रेसची पारंपारिक व्होटबँक असलेली दलित आणि मुस्लीम मते भिवंडी पूर्व व पश्चिम, मानखुर्द, वांद्रे पूर्व, मुंबादेवी मालेगाव आदी मतदारसंघात विभागली गेली. फक्त आदिवासी बहुल नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या हिना गावित यांचा काँग्रेसच्या के. सी पडावी यांनी पराभव केला. पडावी यांनी अक्कलकुवा, नावापुर आणि साक्री मतदारसंघात मताधिक्य मिळवले होते. वंचित बहुजनच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत शिवसेनेच्या विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. हा वंचित फॅक्टर सिंधखेडराजा, मेहकर, खामगाव, बुलढाणा, बाळापूर, अकोलाप., ब्रम्हपूरी, चिमूर, गडचिरोली, नायगाव, देगलुर नांदेड, गंगाखेड, जिंतूर, परभणी असा चालला. येथे वंचित बहुजनच्या उमेदवाराला 25 हजार मते पडली होती.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 288 पैकी 54 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी होती. तसे पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीची 288 विधासभा मतदारसंघापैकी 83 जागांवर पकड आहे. हे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत बदलेले दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘वंचित’ला कौल, काँग्रेस- राष्ट्रवादीला फटका
राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका बसून त्यांचे उमेदवार पराभूत झाले होते.
14 टक्के मते
-48 जागांवर 41 लाख मतदान
बुलडाणा, परभणी, गडचिरोली-चिमूर, सांगली, हातकणंगले, नांदेड, सोलापुरात वंचितला निर्णायक मते.
-अकोल्यात प्रकाश आंबेडकर दुसर्‍या स्थानी. 2 लाख 78 हजार 848 मते
– 13 मतदारसंघात 1 लाखाच्या जवळपास मतदान
-अन्य 29 जागांवर 50 हजारांच्या जवळपास मतदान
-पालघरमध्ये 13,728 मतदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *