

वसई : (प्रतिनिधी) : राजकीय राजपत्रानुसार मुलीचे वय भरत नसल्याने तिला पुन्हा ती शिकत असलेल्या वर्गात पुन्हा बसवण्यात यावे किंवा तीला वर्षभरासाठी घरी बसवण्यात यावे असा अजब सल्ला वसई पश्चिमेतील पापडी-चणाबोरी येथील सेंट अलॉयसीस प्रायमरी स्कूलने एका विद्यार्थीनीच्या पालकाला दिला आहे. शाळेच्या या अजब सल्ल्याने विद्यार्थीनीचे पालक चक्रावून गेले आहेत. शाळेला ही बाब कळत होती तर मग त्यांनी आधी मुलीला शाळेत का घेतले? आणि आता नवीन वर्षाचे गणवेश, पुस्तके, शाळेला दिला जाणारा विद्यार्थ्याचा प्रवास खर्च इतका सगळा खर्च झाल्यानंतर शाळेला सुचलेल्या अजब शहाणपणाविरोधात विद्यार्थीनीची आई रूबिना मुल्ला या ग्राहक पंचायतमध्ये याविरोधात दाद मागणार आहेत.
रूबिना मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्या म्हणतात की, त्यांची मुलगी रिझा मुल्ला हिला सेंट अलॉयसीस प्रायमरी स्कूलमध्ये सीनीयर स्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते. सीनीयर के.जी. या वर्षाची परिक्षा उत्तीर्ण होऊन तिने आता इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश केला आहे. मात्र 2017 सालच्या शासकीय अंदाजपत्रानुसार वय भरत नसल्याने तिला पुढील वर्गात प्रवेश देता येणार नाही असे शाळा व्यवस्थापनाकडुन सांगण्यात आले. शाळेच्या या सल्ल्याने रूबिना मुल्ला यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळावधी झाल्यानंतर शाळेने हा सल्ला दिल्याने त्यात मुलीच्या प्रवेशापर्यंत रूबिना मुल्ला यांचा खूप खर्च झाला आहे. त्यात मुलीचे होणारे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान या सगळ्याला शाळेचा आंधळा कारभार सुस्त असल्याचा आरोप करत त्या ग्राहक पंचायतमध्ये तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
-शाळेच्या अजब सल्ल्याने माझ्या मुलीचे वर्षभराचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळा सुरू होऊन महिनाभरानंतर शाळेला हे शहाणपण सुचलेय. त्यामुळे मी मुलीच्या शिक्षणासाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. याविरोधात मी माझी कैफियत ग्राहक पंचायतमध्ये मांडणार आहे.
-रूबिना मुल्ला, पालक