
फक्त कृषी दिन हा एक दिवस नाही तर वर्षाचे बारा महिने आपण शेतकऱ्यांवर अवलंबून असतो. एक अनुभव सम्पन्न शेतकरी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीमध्ये प्रगती करू शकतो आणि आपल्या समाजाची देशाची प्रगती करू शकतो, असे प्रतिपादन आज कृषी दिना निमित्त वैदेही वाढाण यांनी केले. पालघर मध्ये स्ट्रॉबेरी, चिकू,मोगरा तसेच अनेक वेगवेगळ्या प्रयोगातून वेगळी ओळख निर्माण होऊ शकते असेही मत यावेळी व्यक्त करून तरुणांनी जास्तीत जास्त शेतीत उतरून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन वैदेही वाढाण यांनी केले.
आज दिनांक १ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद पालघर येथे कृषी दिन तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती प्रतिभा गुरोडा, समाज कल्याण समिती सभापती रामू पागी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सारिका निकम, नीता पाटील, राजेश मुकणे, शैलेश करमोडा, कृष्णा माळी,गणेश कासट,मंगेश भोईर, शेलु कुऱ्हाडा करिष्मा उमतोल,रघुनाथ माळी, प्रकल्प संचालक तुषार माळी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे, जिल्हा कृषी अधीक्षक दिलीप नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सम्पन्न झाला.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त ६ शेतकऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. तर बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजने अंतर्गत ३६ पुरस्कार तर विशेष घटक योजनेच्या ८ कृषी अधिकाऱ्यांचा कृषी दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुणवंत शेतकऱ्यांचे अभिनंदन करून तुमची जबाबदारी आणखी वाढली आहे, तुम्हाला तुमच्या सारखे प्रयोगशील शेतकरी तयार करायचे आहेत असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
कृषी समिती सभापती यांनी यावेळी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून सर्व पुरस्कार लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार प्राप्त काही लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, कृषी अधिकारी स्मिता पाटील व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.