

*वाहतूक कोंडी एकीकडे पोलीस दुसरीकडे
*शनिवार-रविवार संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान वाहतूक
* पोलिसांची नितांत गरज
*वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे वाढते प्रमाण
वसई, दि. 09 : वसई रोड (पश्चिम) येथील माणिकपूर नाका हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या नाकावर चारी बाजूने रस्ते एकत्र येतात. एक रस्ता वसई रोड कडून दुसरा रस्ता चुळणे गावातून तर तिसरा रस्ता बर्हामपुर तर चौथा रस्ता वसई गाव, होळी, गिरीज या गावाकडे जाणारा आहे. हा रस्ता ओलांडणे म्हणजे ज्येष्ठ नागरिक, शालेय मुले, महिलांना प्रचंड प्रमाणात तारेची कसरतच करावी लागते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे दर्शन देखील दुर्लभच असते. महिला वाहतूक पोलीस नाक्यावरील चारी बाजूने येणार्या वाहनांचे नियंत्रण न करता मोबाईलवर सतत बोलत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. या बाबत वाहतूक शाखेजवळ तक्रार केल्यास संबंधित महिला पोलिसांची बदली केली जाते. दुसरी येणारी महिला पोलीस देखील याच भूमिकेत काम करते. यावरुन वाहतूक शाखेच्या अंकुशच या पोलिसांवर नाही, असे दिसून येत आहे. शनिवार व रविवारी या विभागात राहणारा ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणात चर्चला जातात. चर्चला जाताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना रस्ता क्रॉस करणे देखील अवघड झाले आहे. शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा वर्दळ असते आणि नेमके याचवेळी वाहतूक पोलीस गायब असतात. दररोज सकाळी 8 ते 11 व संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान या माणिकपूर नाक्यावर प्रचंड प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यावेळी वाहतूक नियंत्रणासाठी किमान दोन वाहतूक पोलिसांची नितांत गरज आहे. एक वाहतूक पोलीस रस्त्याच्या एका बाजूस व दुसरा वाहतूक पोलीस दुसर्या बाजूस असे यावेळी उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडीमुळे जनतेचा वेळ, गाड्यातील पेट्रोल व डिझेलचा नाहक खर्च वाचेल. या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी अनेक वेळा वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु वाहतूक शाखेचे अधिकारी संपतराव पाटील या प्रश्नाकडे गांभिर्याने घेत नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. माणिकपूर नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने वाहतूक पोलीस नियमितपणे उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.