
नालासोपारा :- वसईतील स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. स्कायवॉकवर प्रेमाच्या नावाखाली अश्लिल चाळे करणार्या प्रेमीयुगलांवर पालिका किंवा पोलीसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने वसईचा स्कायवॉक हा जणु प्रेमीयुगुलांचा भेटीगाठींचा संकेतस्थळ बनत चालला आहे. स्कायवॉकवर सकाळ ते रात्रीपर्यंत प्रेमीयुगुलं खुल्लम खुल्ला प्रेमाचे चाळे करताना दिसतात तर रात्री स्कायवॉक गर्दुल्लांचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे या सर्व घटनांमुळे नागरीकांनी स्कायवॉककडे पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे.
वसईतील वाढती लोकसंख्या व त्यामुळे रस्त्यावर वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पादचार्यांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी एमएमआरडीएने वसई पश्चिम स्टेशन येथे रेल्वे स्थानक ते वर्तक महाविद्यालय व्हाया एसटी डेपो ते थेट अंबाडीरोड पोलीस चौकीपर्यंत असा विस्तीर्ण स्कायवॉक उभा केला. परंतू पादचार्यांकडून या स्कायवॉकचा विशेष वापर केला जात नसल्याने सद्यस्थितीत स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. स्कायवॉकवर विशेष गर्दी राहत नसल्याने प्रेमीयुगुलांसाठी वसईचा स्कायवॉक जणु भेटीगाठींचे संकेतस्थळ बनत चालले आहे. सकाळ पासून ते रात्रीपर्यंत स्कायवॉकवर मोठ्या संख्येने बिभित्स चाळे करताना दिसतात. वसईतील काही जागरुक नागरीकांनी स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांच्या चालणार्या चाळ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्कायवॉकवर पोलीस किंवा पालिकेकडून सुरक्षेची कोणतीच तजवीज केली जात नाही. त्यामुळे हा स्कायवॉक गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांना आंदण देण्यात आला आहे. अशा संतप्त प्रतिक्रीया जनमानसातून उमटत आहेत. पालिकेने स्कायवॉकवर फिरते सुरक्षा पथक नेमल्यास या सर्व प्रकारांना आळा बसू शकतो असाही मतप्रवाह आहे.
स्कायवॉकवर प्रेमीयुगलांचे खुलेआम चालणारे अश्लिल चाळे पाहून महिला मुलींना शरमेने मान खाली घालून चालावे लागते. स्कायवॉक हा पादचार्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आला आहे. परंतू प्रशासनाच्या उदासिनपणामुळे स्कायवॉक प्रेमीयुगुलांसह गर्दुल्ले, भिखार्यांचा अड्डा बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस व पालिका प्रशासनाने स्कायवॉकवर चालणार्या गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्त कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.