वसई : (प्रतिनिधी) : तब्बल 45 डिग्री सेल्सीयस पर्यंत चढलेला उन्हाचा पारा, अमगाची होणारी काहीली, पाण्याची तिव्र टंचाई यामुळे घशाला पडलेली कोरड यामुळे वसईकर जनता मोठ्या आतुरतेने मान्सून पर्जन्याची वाट पाहत आहेत. काल पावसाने एक झलक दिल्याने वसईकर जनता सुखावली आहे. वसईच्या ग्रामीण भागात पावसाच्या रिमझीम सरी बरसलण्याबरोबरच ढगांचा गडगडात नी विजांचा कडकडात तसेच थंडगार वार्‍यांमुळे काहीकाळ नागरिकांना हायसे वाटले. गारगार वारा अंगाला झोंबल्याने याआधी उन्हापासून बेहाल झालेल्या वसईकरांनी समाधान व्यक्त केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पर्जन्याची सरी वसई तालुक्यात जोमाने बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वसईतील शेतकर्‍यांसह सर्वच जण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ती प्रतीक्षा संपली असून सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसाने वसईकर सुखावले असून त्यांनी पहिल्या पावसाचा आनंद मनसोक्त भिजून घेतला. या आगमनाने एकीकडे वसईकर सुखावले असून दुसरीकडे वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला त्यांना पहिल्याच पावसात सामोरे जावे लागले. पाऊस पडण्याआधी मनवेल पाडा, सहकारनगर, फुलपाडा, पारोळ, चांदीप, उसगाव, भाताणे या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसाचे आगमन होताच वसई, पापडी, नायगाव, निर्मळ, कळंब या भागातील बत्ती गुल झाली होती.

पावसाच्या चाहूलीने तासाभरासाठी विज खंडित
काल ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामुळे तसेच रिमझीम पाऊस सुरू झाल्याने विरार पूर्वेतील मनवेलपाडा, सहकारनगर तसेच ग्रामीण भागातील शिरसाड, मांडवी, चांदीप, शिवणसई, उसगाव, पारोळ, शिरवली, घाटेघर, सायवन, चाळीसगाव आणि अन्य 10 ते 12 गावांतील विजपुरवठा तासाभरासाठी खंडित करण्यात आला होता. रात्री 12 वाजल्यानंतर विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

नवघर औद्योगिक वसाहतीत विजेचा धक्का लागून कामगार जखमी
नवघर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या शेडवर उभे राहून काम करणार्‍या कामगाराला हायटेन्शन वायरचा धक्का लागून त्यात तो 60 टक्केपर्यंत भाजल्याची घटना घडली आहे. सदर कामगारावर कांदीवली येथील शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अब्दूल शेख असे या कामगाराचे नाव आहे. तो ज्या शेडवर उभे राहून काम करत होता ती शेड अनधिकृत आहे. याअगोदर स्थानिक नगरसेवीका किरण चेंदवणकर यांनी सदर बांधकामावर कारवाई म्हणून थेट पालिका आयुक्तांपर्यंत पत्रव्यवहार केले होते. मात्र पत्रव्यवहार करूनदेखील कारवाई करण्यास पालिकेने असमर्थता दर्शवल्याने पालिकेच्या निष्काळजीपनामुळेच एका कामगाराच्या जीवावर बेतण्याचा प्रकार घडला आहे, या प्रकाराला पालिका आणि कंपनीमालक जबाबदार आहे असे नगरसेविका किरण चेंदवणकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *