

प्रतिनिधी
वसई : वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील दोन नर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे रुग्णालय सील करून; 160 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात टाकण्यात आले होते. पैकी शुक्रवारी 18 पैकी 4 कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर शनिवारी या रुग्णालयातून नायगांव येथील माताबाल संगोपन केंद्रात हलवण्यात आलेल्या चार महिन्याच्या बाळासह सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लगाण झाल्याचे समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सर. डी. एम. पेटीटनंतर पुन्हा एकदा नायगांव येथील बालसंगोपन केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली गेली नसल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे नायगांव येथील बालसंगोपन केंद्रात विनापरवानगी विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केल्याची माहिती आहे. शिवाय या ठिकाणी प्रसूती कक्ष आणि कोरोना विलगीकरण कक्षात जाण्यासाठी एकच मार्ग ठेवल्याने वसई-विरार महापालिका कोरोनाबाबत किती गंभीर आहे; हे दिसून आले आहे.
दरम्यान; वसई-विरार शहरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला पालिका आणि सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका सुरुवातीपासूनच काळजी घेताना दिसली नाही. तर सत्ताधारी पक्ष मोफत रेशनच्या नावे नागरिकांना आरोग्याच्या मुद्द्यापासून भरकटवत राहिला. त्यापेक्षा त्यांनी नागरिकांच्या आरोग्याकड़े लक्ष दिले पाहिजे होते, असे सडेतोड़ मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.