नगररचना विभागातील त्या अधिकार्‍याचीदेखील ईडीकडून होणार चौकशी

बांधकाम व्यवसायिकांना ईडीकडून नोटीसा आल्याने खळबळ

वसई : प्रतिनिधी :

राजकीय पोळी भाजण्यासाठी राज्यात ईडीच्या माध्यमातून प्रसिदद्ध राज्यकर्त्यांची चौकशी चालू असतानाच या ईडीची नजर आता वसईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांवरदेखील पडली आहे. अनेक विकासकांना ईडीकडून नोटीसा आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनधिकृत बांधकामांसाठी पालिकेच्या नगररचना विभागात मोठी सेटिंग लावून एफएसआय तसेच बांधकाम प्लॅन मंजूर करून घेणार्‍या विकासकांची थेट ईडीकडू चौकशी होणार असल्याच्या चर्चेने वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांना अर्थपूर्ण व्यवहारातून सहकार्य करणार्‍या नगररचना विभागातील त्या वरीष्ठ अधिकार्‍याचीदेखील ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याने सध्या हा विषय वसई तालुक्यात चर्चीला जाऊ लागला आहे.
याआधी विरारमधील ठाकूर कुटुंबियांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र टाकण्यात आले होते. त्यानंतर आता थेट प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांनाच ईडीकडून नोटीसा बजावण्यात आल्याने वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाल्याचे दिसून येते. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांचा (बिल्डर) एक समुह आहे. त्यांनी महापालिकेकडून नियमबाह्य पद्धतीने एफएसआय तसेच बांधकाम प्लॅन मंजूर करून घेऊन करोडो रूपयांची बांधकामं केली आहेत. बोगस सीसी तसेच दुय्यम निबंधकांकडे बोगस कागदपत्रांच्या आधारे बांधकामांची केलेली नोंदणी या प्रकारांमुळे वसईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक ईडीच्या रडारवर आहेत. यातील काही बांधकाम व्यवसायिकांना ईडीकडून नोटीसा धाडण्यात आल्याने इतर बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अनधिकृत बांधकामांमुळे वसई-विरार शहर महानगरपालिका परिसराची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. याप्रकरणी आता थेट ईडीनेच प्रकरण हाती घेतल्याने वसईतील अनधिकृत बांधकामांना अटकाव बसण्यास मदत होऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या स्वयंघोषित नेत्याला ईडीकडून चौकशीसाठी बोलावणे?
दरम्यान, वसईतील एका स्वयंघोषित शिवसेनेच्या नेत्यालादेखील ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते. ईडीकडून या बांधकाम व्यवसायिकांची चौकशी करण्यात येण्याच्या खात्रीलायक वृत्तानंतर बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *