
Gangadhar mhatre Narvekar मागणी डाउनलोड फाईल

वसई, (प्रतिनिधी) : वसईच्या पुर्व पट्टीतील कामण गावचे समाजसेवक यादव म्हात्रे यांच्या मारेकर्यांना शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू गंगाधर म्हात्रे एकाकी लढा देत आहेत. त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ले तर झालेच संपत्तीही गमवावी लागली आहे, तरीही गेली ३५ वर्षे त्यांनी मृत भावाला न्याय देण्यासाठी आपला लढा सुरुच ठेवला आहे. हा खटला आता अंतिम टप्प्यात आला असल्याने आरोपींपासून जिवाला धोका असल्याने मला अपघातातही ठार मारतील अशी भिती म्हात्रे यांनी व्यक्त करुन हा खटला सुरु असेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी व न्यायासाठी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचना केली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील वसई-भिवंडी रस्त्यावरील कामण गावातील समाजसेवक यादव म्हात्रे यांची २९ जून १९८७ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हा खून त्यांचे धाकटे बंधू गंगाधर म्हात्रे यांनी पाहिला होता. त्यामुळे या खटल्यात त्यांची साक्ष महत्वाची होती. त्यांनी मारेकर्यांना प्रत्यक्ष पाहिले असल्याने त्यांची नावे पोलिसांना सांगितली होती मात्र मारेकरी हे धनदांडगे असल्यामुळे त्यांनी त्यांच्याऐवजी गावातील आदिवासी तुंबडा कुटुंबाला या खूनात गोवण्यात आले होते. त्यामुळे गंगाधर म्हात्रे यांना या खटल्यात दुतर्फा लढा द्यावा लागला. निष्पाप आदिवासींना या खटल्यातून सोडवणे आणि खर्या मारेकर्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांनी सीआयडी पासून शासनाच्या अनेक विभागाच्या पायर्या झिजवल्या. विधानभवनातही हा खटला तत्कालीन आमदार मृणाल गोरे यांनी गाजवला होता. मात्र या सर्वांची साथ गंगाधर म्हात्रे यांना क्षणीक ठरली. परंतु या खटल्यात गोवलेल्या आदिवासींची निर्दोष सुटका करण्यात त्यांना यश आले. मात्र या दरम्यान त्यांच्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. वारंवार पोलीस, गृहमंत्रालय, मानव अधिकार, न्यायालयाच्या पायर्या चढाव्या लागत असल्यामुळे त्यांची नोकरी गेली. पैशाप्रमाणेच सगेसोयर्यांनीही त्यांची साथ सोडली. हे कमी की काय त्यांच्या कुटूंबियांवर दरोड्याची केस टाकण्यात आली. मात्र त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. जिवाच्या भितीने त्यांनी गावातील जमीन जुमला विकून गाव सोडले. आरोपी हे धनदांडगे असल्यामुळे पोलिसांनी तपासाची वारंवार दिशा बदलली. त्यांना सीआयडी आणि महसूल खात्याचीही साथ लाभल्यामुळे खटला लांबत चालल्याचा आरोप करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गंगाधर म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांपासून, राज्यपाल, राष्ट्रपतीं आणि राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाकडे वारंवार केली. त्यामुळे या पातळीवरुन कार्यवाही करण्याचे आदेश खालच्या कार्यालयाला देण्यात आले. त्यामुळे त्या-त्या वेळी या खटल्याला गती येते, मात्र त्यानंतर पुन्हा या खटल्याच्या फाईल धुळ खात पडल्या जात आहेत.
म्हात्रे यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा पाय मोडल्यामुळे सहा महिने त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. त्यातही त्यांचे लाखो रुपये खर्च झाले. प्राणघातक हल्ला होत असतानाही म्हात्रे यांनी आदिवासी सेवेचे काम सुरुच ठेवले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेवून आदिवासी सेवक पुरस्काराने राज्य शासनाने त्यांना सन्मानित केले. आदिवासींची खटले आणि भावाच्या खूनाचा लढा लढत असल्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी वारंवार केली होती. काही काळ पोलीस संरक्षण देण्यात आले होते. तर काही काळ जेंव्हा खटल्याची तारीख असेल तेंव्हाच त्यांना पोलीस संरक्षण देऊन प्रशासनाने आपले कर्तव्य बजावले. ३५ वर्षे सुरु असलेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आला असल्याने आरोपींपासून जिवाला धोका असल्याने मला अपघातातही ठार मारतील अशी भिती म्हात्रे यांनी व्यक्त करुन हा खटला सुरु असेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी तत्कालिन पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची भेट घेतली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी महाजन आणि डॉ. गुरसळ यांनी त्यांची बाजु ऐकूण घेतली. त्यानंतर त्यांच्या या मागणीवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, परंतु जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांची ही बदली झाली असल्याने मला न्याय कसा मिळेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून वरील मागणीसाठी आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे यांनी आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तसेच राज्याचे राजपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.