वसई (पूर्व) : प्रतिनिधी
वसई (पूर्व) येथील Universal College of Engineering संदर्भात किमान वेतन न देणे, बेकायदेशीररीत्या कामावरून दूर ठेवणे तसेच विविध कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी पालघर येथील कामगार उपआयुक्त कार्यालयाने दखल घेत संबंधित पक्षांना सुनावणीसाठी पाचारण केले आहे.

युवाशक्ती कामगार संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कामगारांना किमान वेतन, ईएसआय, ग्रॅच्युइटी आदी कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कामगारांना कामावरून दूर ठेवण्यात आल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

सदर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कामगार उपआयुक्त कार्यालयाने अधिकृत बैठक बोलावली असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाकडून न्याय्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, युवाशक्ती कामगार संघटनेने स्पष्ट केले की, कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून त्यांच्या प्रलंबित वेतनासह सर्व कायदेशीर हक्कांची पूर्तता करावी. अन्यथा कायद्याच्या चौकटीत राहून शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

या प्रकरणाकडे कामगार व शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले असून, सुनावणीनंतर नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *