साहित्यिका नीरजा, अभिनेत्री दिप्ती भागवत

आणि कवी अरुण म्हात्रे यांची खास उपस्थिती

वसई : वार्ताहर

कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखा आणि वासळई येथील म्हात्रे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव काळात बुधवार, दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी देवतलाव येथील वसई शेतकरी सहकारी सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी 4 वाजता भव्य काव्य संमेलन आणि काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी आजपर्यंत ठाणे – पालघर जिल्ह्यातील 45 कविंनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती वसई शाखेचे कार्याध्यक्ष, तथा लेखक रेमंड मच्याडो यांनी दिली.

   ज्येष्ठ आणि प्रख्यात साहित्यिका नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दुहेरी समारंभास प्रमुखपाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, विशेष अतिथी म्हणून कोमसापचे माजी केंद्रीय अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर, तर कोमसापचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर या सोहोळ्याच्या सूत्रसंचालनानिमित्ताने  अभिनेत्री दिप्ती भागवत यावेळी हजेरी लावणार आहेत.

ग्रंथालय चळवळीत योगदान देणारे साहित्यप्रेमी स्व. हरिभाऊ म्हात्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या दुहेरी समारंभाचे आयोजन करण्यात आले असून,
याप्रसंगी स्व. हरिभाऊंच्या कार्य आणि वाटचालीच्या स्मृति जागविण्यासाठी खास स्मृतिग्रंथाचे, तसेच वसईतील ख्यातनाम सीए अनादि भसे यांच्या “सतरंगी” या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी पार पडणार आहे.

       काव्य स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्हासह भरघोस रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक : रु. ५,०००/-, द्वितीय क्रमांक : रु. ३,०००/-, तृतीय क्रमांक : रु. २,०००/- आणि उत्तेजनार्थ म्हणून :  रु. १,०००/- याप्रमाणे. तसेच अन्यही स्पर्धेतील सहभागी कविन्ना सहभागाविषयी प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या कवींनी वादग्रस्त विषय टाळून आपली कविता सुमारे १६ ओळींच्या आत आणि अडीच मिनिटे वेळ मर्यादेत सादर करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्यरसिक व मराठी भाषाप्रेमी यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन म्हात्रे-वर्तक परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *