
वसई ( डॉ. अरुण घायवट) वसई तालुक्यातील भूमाफियानी वसईतील अनेक जागा गिळंकृत केल्या आहेत. देवस्थान जमिनी, आदिवासीच्या शर्थीने दिलेल्या जमिनी, क्रीडांगण, स्कूल, हॉस्पिटल साठीचे राखीव भूखंड, इनामाच्या जमिनी, वतनाच्या जमिनी लाटून झाल्या नंतर आता खाडी ची जागा बलकवण्याची मजल यांनी मारली आहे . वसई तहसीलदार कचेरी समोरील खाडीचे रूप सद्या माडी आणि वाडीत विलीन होऊ लागले आहे मात्र याचे सोयर सुतक ना महसूल विभागाला आहे ना पर्यावरण विभागाला आहे.
वसई तहसीलदार कचेरी समोरील नाना नानीच्या कट्या कडील डावी उजवी बाजूकडे पूर्वी खाडी असायची. पावसाळ्यात समुद्राच्या भरतीचे पाणी या ठिकाणी येत असे हा भाग वर्षा नु वर्ष सीआरझेड खाली होता. यातील एक मोठा भाग गुरुचरण होता तर उर्वरित जागा महाराष्ट्र सरकारची होती. मात्र मागील चार वर्षापासून या खाडीचे रुप पालटून गेले आहे. आता या खाडीत एक भली मोठी माडी आणि उर्वरित जागेवर वाडी झाली आहे. या माडीत आणि वाडीत वसईतील बड्या राजकारणी लोकांची पार्टनर शिप आहे. शेकडो एकरचा हा शासकीय भूखंड मोठ्या अक्कल हुशारीने बलकवला जात आहे. या चोरीत महसूल खात्याचे वरपर्यंत हात बरबटले आहेत. महाराष्ट्र शासनाची जागा सहज लुटली गेली आहे. आणि महसूल खाते गण गांधारीच्या भूमिकेत आहे. आता तर या वाडी आणि माडी वाल्याने मोठ मोठे बांध आणि मातीचा भराव टाकून समुद्राचे भरतीचे पाणी या भागात पसरू नये म्हणून शक्कल लढविली आहे. सद्या ही खाडी वाडी आणि माडीत रुपांतरीत होत असल्याने आता येथील ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी जागा होऊ लागला आहे. या भागात खुलेआम पर्यावरणाचा खून केला जात आहे. निसर्ग बदलला जात आहे. याची दखल घेऊन आता या खाडीची वाडी आणि माडी करणाऱ्यावर पर्यावरण कायद्याखाली गुन्हे दाखल करा अशी मागणी दैनिक आपला उपनगर ने महसूल मंत्री सह जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली आहे. आता खाडी वाचविण्यासाठी कोण पुढाकार घेतो हे पहायचे आहे.