
वसई (प्रतिनिधी) — वसई तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी सोमवारपासून संपावर गेल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. तलाठी कार्यालयांमध्ये आवश्यक असलेली मूलभूत साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेने सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, तालुका वसई यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या संपात ५२ तलाठी सजा पैकी ३२ तलाठी आणि ९ मंडळ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या अधिकाऱ्यांनी तलाठी कार्यालयांसाठी आवश्यक असणाऱ्या डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे (डीएससी) नायब तहसीलदार शशिकांत नाचण यांच्याकडे जमा केली असून, यावेळी प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आले आहे.
तलाठी कार्यालयांमध्ये लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनरसारखी अत्यावश्यक साधने नसल्यामुळे ऑनलाइन कामकाज करणे कठीण होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक तलाठी गेल्या काही काळापासून स्वतःची वैयक्तिक साधनसामग्री वापरून काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, आधीच विविध प्रमाणपत्रे, फेरफार आणि महसूलविषयक कामे ठरावीक मुदतीत होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी तहसील कार्यालयात दाखल होत असतात. त्यातच या संपामुळे महसूल संदर्भातील कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
प्रशासनाने तातडीने आवश्यक साधनसामग्रीची पूर्तता करून कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी आंदोलक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
