
देहदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते. मृत्यू कोणाला चुकलेला नाही. पण मृत्यू नंतरही मनुष्याने मानवाच्या कामी येण्याची संधी देहदानाद्वारे उपलब्ध आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि वैद्यकशास्त्राच्या विविध संशोधनासाठी हा देह कामी येतो.
नवघर – वसई येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती साधना ऑगस्टीन ह्यांचे पती श्री जेरेमिया जोसेफ ऑगस्टीन, वय ६५ वर्षे ह्यांचे शनिवार, दि. १५ जून, २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी पतीच्या इच्छेनुसार श्रीमती साधना व मुलगा डॉ. कौस्तुभ ह्यांनी देहदानाचा निर्णय घेतला. देहदान चळवळीचे प्रणेते श्री पुरुषोत्तम पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तसेच डॉ. कौस्तुभ ह्यांनी नायर हॉस्पिटलशी संपर्क साधला. मृत्यूच्या वेळेपासून सहा तासाच्या आत देह नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय रुग्णालयामध्ये पोहोचता करायचा असतो परंतु डॉ. कौस्तुभ व काही नातेवाईक मंडळी ह्यांना यायला उशीर होणार असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देह रात्रभर शवागारात ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी अंतिम दर्शनानंतर देह नायर हॉस्पिटलला पाठवण्यात आला व तेथे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. अशा रीतीने वसईत आणखी एक यशस्वी देहदान पार पडले. या प्रक्रियेत श्री पुरुषोत्तम पाटील पवार ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप राऊत, श्री. पाटणकर, आणि विशेषतः नायर हॉस्पिटलचे डॉ. युवराज भोसले, श्री लक्ष्मण धुरी, डॉ. सुमेध आणि सानिया यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
जनतेने देहदान व अवयव दान चळवळीत मोठया संख्येने सहभागी होऊन पुण्य कर्म करावे असे आवाहन दि फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार ह्यांनी केले आहे. ह्या उपक्रमाची माहिती अथवा विचार मांडण्यासाठी ९९२२०४९६७५ ह्या क्रमांकावरती फोन करावा अथवा व्हाट्स उप मेसेज करावा.
——————————————-