
वसई ( प्रतिनिधी )- वसई तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींसाठी येत्या १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. खानिवडे, भाताणे, सकवार, शिवणसई, शिरवली, भिनार, मेढे, आडणे, माजिवली, चंद्रपाडा आणि पोमण या ११ ग्रामपंचायतींसाठी सदरची निवडणूक होत आहे.
या मतदानासाठी आता रणांगण सज्ज झाले असून ११ सरपंच पदांच्या जागांसाठी ३१ उमेदवार रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर ११९ सदस्य निवडणुकीसाठी २६१ उमेदवार रणांगणात उतरले आहेत. येत्या १६ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक प्रक्रिया संपन्न होत असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्धव व शिंदे गट वेगवेगळी लढत देणार असल्याने उद्धव सेनेच्या सोबतीला आगरी सेना धावून आली आहे. तसेच काँगे्रसही शिवसेनेसोबत युती करणार आहे.दरम्यान, ग्रामीण भागात आजही उद्धव सेनेचा बोलबाला आहे. तर मनसे व भाजप या निवडणुकीत स्व-बळावर उतरणार आहे. मनसे व भाजप या निवडणुकीत स्वबळावर उतरली असली तरी या दोन्ही पक्षांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. तर दुसरीकडे बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी यंदा निवडणुकीसाठी मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार आहे. यंदा बहुजन विकास आघाडीला काही ग्रामपंचायतींत आव्हानात्मक लढत द्यावी लागणार आहे. मागील पाच वर्षात बहुतांश ग्रामपंचायतींवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र विकासकामांच्या बाबतीत तेथील सदस्यांनी निराशा केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मतदारांची निराशाच बविआला आव्हानात्मक लढतीकडे घेऊन जाणार असल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.११ ग्रामपंचायतींसाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र ग्रामीण भागात उद्धव सेनेच्या सोबतीला आगरी सेना व काँग्रेस आल्याने येथे शिंदे गटाला निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. दरम्यान, मतदारांना आता प्रतिक्षा आहे ती १६ ऑक्टोबरच्या मतदानाची.