
महोत्सव पुढे ढकलण्याच्या आयुक्तांच्या सूचना
वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनीही घेतली होती हरक़त

प्रतिनिधी
विरार- वसई कला-क्रीड़ा महोत्सवात भाग घेणारे स्पर्धक, कलाकार व नागरिक यांना कोविड-१९ विषाणू ‘ओमायक्रोन वेरियंट’ची बाधा होऊन शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता; २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला वसई कला-क्रीड़ा महोत्सव पुढे ढकलण्यात यावा, अशा सूचना आयुक्त गंगाथरन ड़ी. यांनी वसई तालुका कला-क्रीड़ा मंडळाला केल्या आहेत.
वसई तालुका कला-क्रीड़ा मंडळाने १५ नोव्हेबरच्या पत्रद्वारे या महोत्सवाकरता परवानगी मागितली होती; मात्र आयुक्त गंगाथरन डी. यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या आहेत. तसे पत्र आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसई तालुका कला-क्रीड़ा मंडळाला ७ डिसेंबर रोजी दिले आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नरवीर चिमाजी आप्पा मैदानात दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते; मात्र कोविड-१९मुळे मागची दोन वर्षे हा महोत्सव झालेला नाही. यापूर्वी एकूण ४३ प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन या महोत्सवात झालेले आहे. तर ५५ हजार इतक्या गर्दीचा उच्चांक नोंदवला गेलेला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत कोविड-१९ ची लाट किंचित ओसरलेली असल्याने वसई तालुका कला-क्रीड़ा मंडळ हा महोत्सव आयोजित करण्याच्या विचारात होते. त्या अनुषंगाने मंडळाच्या बैठका आणि विचारविनिमय झालेला होता.
कोविड-१९ची तिसरी संभाव्य लाट आणि कला-क्रीड़ा महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता या महोत्सवाला वसई भाजपचे अल्पसंख्याक तसनीफ़ नूर शेख यांनी हरकत घेतली होती.
परिणामी वसई तालुका कला-क्रीड़ा मंडळाने या स्पर्धा मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत बंदिस्त सभागृहात घेतल्या जातील, असे सांगितले होते.
दरम्यान; ‘ओमायक्रोन वेरियंट’च्या नव्या विषाणूने राज्यात बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढून तिसरी लाट येण्याची शक्यता पालिकेनेही नाकारलेली नाही. त्यामुळे काही निर्बंध लागू करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
त्यामुळेच २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला वसई कला-क्रीड़ा महोत्सव पुढे ढकलण्यात यावा, अशा सूचना आयुक्त गंगाथरन ड़ी. यांनी वसई तालुका कला-क्रीड़ा मंडळाला केल्या आहेत.