

विरार : ‘कोरोना’ या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि वसई-विरार महानगर पालिका प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. याचाच गैरफ़ायदा घेत वसई-कोळीवाडा येथे अनेक वॉटर सप्लायर्सकडून शुद्ध पाण्याच्या नावावर मोठी फसवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मागील काही दिवसांत या ठिकाणी अनेक वॉटर सप्लायर्स निर्माण झाल्याने नागरिकांना धक्का बसला आहे.
वसई-कोळीवाड़ा नूरी मैदानाजवळ इनाया वॉटर सप्लायर्स नावाचा शुद्ध पाण्याचा प्लांट आहे. या प्लांटच्या परवानगी आणि शुद्ध पाण्याबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. वसई-विरार महापालिकेनेही या प्लांटला परवानगी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्लांटला सुगीचे दिवस आले असून; शुद्ध पाण्यासाठी म्हणून या प्लांटसमोर रांगा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र शुद्ध पाण्याच्या नावावर या प्लांटमधून फसवणूक होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून; 5 ते 10 रूपयांना असणारी बाटली आता 40 ते 50 रूपयांना विकली जात आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत अनेक वॉटर सप्लायर्स या भागात फिरताना दिसत आहेत. या सप्लायर्सनी आपल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर ‘अत्यावश्यक सेवा’ असे स्टिकर चिटकवले असून; या सेवेआड पाण्याचा काळा व्यवसाय सुरू केला असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने नागरिकांचे आरोग्य आणखी धोक्यात आले आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका आरोग्य विभागाने तात्काळ अशा सप्लायर्सवर कारवाई करून त्यांचे प्लांट सील करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.