वसई गाव परिसरात भारत पेट्रोलियम – सागरशेत पेट्रोल पंपावर जनतेचा आक्रोश : पेट्रोलमध्ये पाणी!

वसई गाव परिसरातील भारत पेट्रोलियम सागरशेत पेट्रोल पंपावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, लोकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने गाड्यांचे इंजिन बंद पडत आहेत, वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे व वाहतूक कोंडीसुद्धा होत आहे. हे केवळ ग्राहकांची फसवणूक नसून भारतीय दंड विधान (IPC) कलम 420 (फसवणूक), 272 व 273 (मिश्रण करून आरोग्यास हानीकारक वस्तू विकणे) तसेच कायदेशीर मोजमाप अधिनियम 2009 व पेट्रोलियम ऍक्ट 1934 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

याबाबत संबंधित प्रशासन – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, वजन-मोजणी विभाग, ग्राहक संरक्षण विभाग तसेच पोलिस प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

स्थानिक जनतेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई केली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *