
वसई(प्रतिनिधी)-वसई , विरार नालासोपारा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शालेय व कॉलेज मधील विविध प्रकारचे दाखले न मिळणे,अनधिकृत रिसॉर्ट, स्पा सेंटर व मसाज पार्लर मधील गैरप्रकार,शासकीय जमिनी हडप करणे,तलाव बुंजवणे,तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित नसणे,सर्व सामन्यापर्यंत शासकीय योजना न पोहचणे, महसूल व पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार अश्या विविध प्रकारच्या समस्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल वसई तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना जाब विचारत १५ दिवसात सदर समस्या वर उपाययोजना करण्याची मागणी केली.तसेच उपयोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
वसई तहसील कार्यालयातील ‘सेतू’ मध्ये दलालांचा सुळसुळाट असल्याचे पहावयास मिळत आहे.याठिकाणी विविध दाखल्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांची अक्षरशः लूटमार सुरू आहे. याठिकाणी दाखल्यांसाठी येणाऱ्याला सर्व कागदपत्रे जोडूनही शुल्लक त्रुटी दाखवून रांगेत ताटकळत ठेवले जात आहे तर दुसरीकडे मागील दराने दलालांमार्फत येणाऱ्या अर्जावर कार्यालय कामकाज संपल्यानंतर कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे १५ ते २० रुपयात मिळणाऱ्या दाखल्यांसाठी पाच ते दहा हजारांपर्यंत लूटमार होत आहे.याठिकाणी सायंकाळी ५ नंतर दलाललॉबी सक्रिय होत असून रात्री उशिरापर्यंत आर्थिक व्यवहार सुरू असतात.वास्तविक वसई तालुक्यातील विदयार्थी यांना शालेय शिक्षणा साठी विविध प्रकारचे दाखले वेळीच मिळणे आवश्यक असल्याने वसई तहसिल कार्यालय सेतू व महा ईसेवा मार्फत विविध शिबिरा चे आयोजन केले जाते. पूर्वी शिबिरात ऑफलाईन दाखले दिले जात होते मात्र आता शासना च्या नवीन धोरणा नुसार ऑनलाईन दाखले बंधनकारक केल्याने सदर शिबिरात तात्काळ दाखले विद्यार्थी व नागरिक यांना मिळाले नाहीत.नियमानुसार अर्जदारास तीन दिवसात दाखले देणे सेतूस बंधनकारक आहे.परंतु वास्तवात तहसील कार्यालयात संबंध दिवस रांगेत उभं राहून देखील बहुतेक चक्करा मारल्या नंतर च दाखला मिळतो. त्यात काही वेळा घाईगडबडी चे कारण दाखवून मुद्दाम चुका ठेवल्या जातात. त्यात लाईट जाणे,नेट स्लो चालणे या सारखी असंख्य कारणे दिली जातात परंतु वास्तव काही वेगळे आहे. ज्या सेतू कार्यालयात कर्मचारी काम करतात त्यांना पगार दिला जात नाही तर दाखल्या च्या शासकीय फी व्यतिरिक्त वाढीव फी आकारून त्यांनी त्यांचा पगार कमवावा असे वसई सेतू चे ठेकेदार मोहनदास पाटील सांगतात.त्यामुळे कर्मचारी सेतू कार्यालयात आलेल्या अर्जाचे व शिवारात आलेल्या अर्जावर दुर्लक्ष करतात तसेच ठेकेदार दलाल मार्फत अधिवास व जातीच्या दाखले तसेच रेशनकार्ड करिता पाच हजार रुपया पर्यंत पैसे घेऊन तात्काळ दाखले देतात. या करिता ह्या सर्व दलाल यांचा कार्यालया च्या वेळ नंतर रात्री उशिरापर्यंत वावर- सुळसुळाट असतो. एकप्रकारे ऑनलाइन खूप काम असल्याच्या नावावर वसई तहसिल कार्यालयात
रात्रीस खेळ खुले आम सुरु असतो.या करिता कोणत्याही राजकीय पक्षांची,प्रशासना ची अथवा कायद्याची भीती-दहशत वसई तहसीलच्या प्रशासकिय आधिकारी यांना नसल्याने राजरोसपणे भ्रष्टाचार बोकाळला आहे.यामुळे सर्व सामान्य वसईकर त्रस्त आहेत .
यावेळी वसई उपविभागीय अधिकारी दीपक क्षिरसागर आणि वसईचे तहसिलदार किरण सुरवसे यांच्या सोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी दिड तास चर्चा करत सकारात्मक प्रतिसाद दिला.दरम्यान तहसिलदार कार्यालयाचा जनरेटर हा निधी अभावी बंद असल्याचे सांगण्यात आल्यावर मनसे जनरेटर उपलब्ध करुन देत असल्याचे सांगण्यात आले. या चर्चेत पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वितेंद्र पाटील, विद्यार्थी सेनेचे जितेंद्र अग्रवाल, कामगारसेनेचे विजय मांडवकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सुळे, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, प्रफुल्ल ठाकूर,प्रशांत खांबे, हरिश्चंद्र सुर्वे राज नागरे, किशोर कारेकर,प्रफुल्ल जाधव,प्रफुल्ल पाटील तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
