वसई : पाचूबंदर येथील वसई मच्छीमार सहकारी सोसायटीच्या आवारात इस्टरनिमित्त चिकनची दुकाने लावण्याची मुभा देण्यात आली होती; मात्र या दुकानांतून चिकन घेतलेल्या काही ग्राहकांनी चिकनमध्ये किडे आढळल्याच्या तक्रारी केल्या असल्याने मच्छीमार सोसायटी समोरील पेच वाढला आहे.

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा आणि पालिका प्रशासनाने संचार बंदी नियम लागू केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. प्रशासनाने ‘सोशल डिस्टनसिंग’ करण्यास केलेल्या आवाहनाचेही ठिकठिकाणी उल्लंघन होताना दिसत आहे.

मागील आठवड्यात या ठिकाणी भरवलेल्या भाजी बाजारात महिलांची प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच चक्क दुसऱ्या दिवशी इस्टरचे निमित्त पुढे करत याच ठिकाणी चिकनची दुकाने लावण्याची मुभा देण्यात आली होती.

आता याच दुकानांतून चिकन घेतलेल्या तीन ग्राहकांनी चिकनमध्ये किड़े आढळले असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दुसरीकडे येथील एक मटणवाला बकऱ्याच्या मटणात मेंढीचे मटण मिसळतो, अशाही तक्रारी आहेत.

…………

तो मुंबईतून आला थेट वसईत!

वसई-पाचूबंदर येथील मच्छीमार सहकारी सोसायटीचा संचालक ‘लॉकडाउन’ काळात थेट मुंबईहून वसईत आल्याने परिसरात नागरिकांची पाचावर धारण बसली आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव वसईत वाढत असताना वसई मच्छीमार सोसायटीचा संचालक कोणत्या मार्गाने आला, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र हा संचालक मुंबईने बोटीने वसईत आला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या व्यक्तीने तातडीने आपली कोविड-19 चाचणी करून घ्यावी, असा दबाव वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *