वसई : राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानांत गर्दी करत असून; नागरिकांच्या गर्दीमुळे वसई-पापड़ी येथील रामफेर यादव आणि बचत गटाच्या रेशनिंग दुकानात शनिवारी सकाळी पुन्हा एकदा सामाजिक अंतराचे नियम मोडीत निघाल्याचे निदर्शनास आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अन्नधान्य तुटवड़ा होऊ नये म्हणून राज्य सरकारने रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. 1 एप्रिलपासून हे धान्य उपलब्ध झाले असून; दुकानांवर गर्दी न करता नागरिकांना धान्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र त्यानंतरही नागरिक रेशनिंग दुकानांवर गर्दी करत आहेत. वसई-पापड़ी येथील रामफेर यादव आणि बचत गटाच्या रेशनिंग दुकानवरही शनिवारी सकाळी असेच चित्र होते. विशेष म्हणजे प्रभाग-109 च्या नगरसेविका उजमा दिलदार पिरखान या ठिकाणी उपस्थित असतानाही सामाजिक अंतराचे सर्व नियम मोडीत निघताना दिसत होते.

दरम्यान; उजमा दिलदार पिरखान स्वत: उपस्थित राहून लोकांना रेशन घेण्याचे आवाहन करत असल्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात वसई पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांच्याशी संपर्क साधला असता; त्यांनी कर्मचारी अभाव आणि अपुरे पोलीस बळ यामुळे कारवाई करण्यास हतबलता दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *