प्रतिनिधी : मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत असून अर्थातच या अनैतिक धंद्यांना पोलिसांचे संरक्षण लाभलेले आहे. या अनैतिक धंद्यांवर कारवाई व अवैध धंदेवाल्यांकडून अवैध वसुली करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित सर्वांना तक्रारी दिल्या आहेत. सदर प्रकरणी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. कारवाई का झाली नाही याची चौकशी व्हावी. सदर प्रकरणी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधला असता आपली तक्रार उपायुक्त परिमंडळ २ यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीत प्रचंड प्रमाणात अनैतिक धंदे चालतात. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय सदरचे अनैतिक धंदे चालूच शकत नाहीत. वसई पोलिसांच्या वसुली संदर्भात मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर वसुली करणाऱ्या प्रवीण अशोक सोनार याची बदली करण्यात आली. मात्र सदर प्रकरणात ठोस कोणतीही कारवाई झाली नाही. वसई पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अनैतिक धंदे चालतात. त्यातील काही धंदे व त्या धंदेवाल्यांकडून पोलीस जी वसुली करतात त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे: भुईगाव पोलीस चौकीमध्ये विना परवाना रेती व्यावसायिकांकडून ४० हजार हप्ता, नायगाव उड्डाण पुलाजवळून अवैध रेती उपसा करणाऱ्यांकडून ७० हजार हप्ता, अवैध दारूचा धंदा चालविणाऱ्या प्रकाश दांडेकर याच्याकडून महिना २० हजार हप्ता, सतीश सातघरे महिना २५ हजार हप्ता, कोळीवाड्याचा जाकीर, आरिफ, पापडीचा समीर पै, मधु राठोड यांच्या सह तमाम अनैतिक धंदे करणाऱ्यांकडून पोलीस दर महा हप्ता घेतात. प्रवीण सोनार याची बदली मुख्यालयात झालेली असताना प्रवीण सोनार हाच वसुली करीत आहे. वसई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कल्याणजी करपे यांच्याकरिता प्रवीण सोनार हा हप्ता वसुली करतो यात वाद नाही. हप्त्याची ही रक्कम मंत्रालयापर्यंत जाते. १०० कोटीच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अडकले. ते आज तुरूंगाची हवा खात आहेत. मात्र त्या नंतर ही अनैतिक धंदे व त्या धंदेवाल्यांकडून वसुलीचे उद्योग बेधडकपणे चालूच आहेत.
सदर प्रकरणी कारवाई होत नसल्याबद्दल पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे विचारणा केली असता आपली तक्रार उपायुक्त परिमंडळ २ यांच्याकडे पाठविण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी सातत्याने तक्रारी देऊन, वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्घ करून सातत्याने तक्रारी करून ही कोणतीही कारवाई होत नाही, याचे कारण स्पष्ट आहे आणि ते म्हणजे पोलिसांचे अवैध धंद्यांना संरक्षण ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *