वसई/विशेष प्रतिनिधी
वसई-विरार, भाईंदर खाडीवरुन मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने नायगाव कोळीवाड्यामधील मच्छिमार बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक मच्छिमारांचा खाडी पुलाला विरोध नाही परंतु ज्या परिसरातून खाडी पुल जाणार आहे त्या जागेवर मच्छिमार बांधव सध्या मच्छी सुकत घालण्यासाठी वापर करतात शिवाय नायगाव मच्छिमार आणि गावातील तरुण वर्ग क्रीकेट खेळण्यासाठी तसेच इतर खेळ खेळण्यासाठी बाधीत होणार्‍या जागेचा वापर करत आहे. या खाडी पुलामुळे मच्छिमार बांधवांना मच्छि सुकत घालण्यासाठी आणि तरुणांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होणार नसल्याने मच्छिमार बांधवांमध्ये आणि तरुणांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यात नायगाव मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या संचालक मंडळाने मच्छिमार बांधवांना विश्‍वासात न घेता एमएमआरडीए आणि संबंधीत विभागाशी परस्पर पत्रव्यवहार करुन नायगाव मधील मच्छिमार बांधवांना अंधारात ठेवल्याने त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण पसरले असून हा प्रस्तावित खाडीपुल होणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
वसई-भाईंदर या खाडीवरील बहुचर्चित पुलाबाबतचे काम रखडणार की काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कारण, नायगाव कोळीवाड्यातील नागरिकांची पूर्ण संमती घ्यावी अशी सक्षम प्राधिकरणांनी नायगाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितच्या संचालक मंडळाला लेखी कळविले होते. परंतु संस्थेच्या संचालक मंडळाने कोळीवाड्यातील नागरिकांना विश्‍वासात न घेता संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करत होते. त्याची जाहिर वाच्यता कुठेच होत नव्हती. जेव्हा वसई-भाईंदर खाडी पुलाची निविदा आणि वृत्त वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर कोळी बांधवांमध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आपले मच्छिमार सोसायटीचे संचालक मंडळाचे काही पदाधिकारी संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार आणि संपर्कात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सदर सोसायटीने संबंधीतांबरोबर केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती नकाशे स्थानिक जागृत नागरिकांनी मिळविल्या त्यात अनेक बाबी समोर आल्या.
नायगाव सर्वे नं. 12 या जमिनीवरुन पुल जाणार आहे. सदर स. नं. च्या जमिनीवर मच्छिमार बांधव हे सद्य:स्थितीत मच्छि सुकत घालणेसाठी करतात शिवाय कोळीवाड्यातील लहान व तरुण मुले क्रिकेट आणि इतर खेळ खेळण्याच्या सरावासाठी याच जागेचा वापर करतात, त्यामुळे या पुलामुळे दोन्ही कारणासाठी होत असलेली जागा बाधीत होणार आहे. हा प्रकार खरं तर सोसायटीने नागरिकांना विश्‍वासात घेवून करणे गरजेचे होते. परंतु सोसायटी संचालकांनी काही ठराविक लोकांना हाताशी घेत आपला कारभार केला तर एका पत्रात बाधीत होणार्‍या जमिनीचा मोबदला काय देणार असे स्पष्ट नमुद असल्याने सोसायटी संचालक मंडळाच्या कारभारावर संशयाचे ढग जमा झाले आहेत.
नायगाव कोळीवाड्यातील काही जागरुक नागरिकांनी संबंधीत विभागाकडून सर्व कागदपत्र आणि खाडी पुलाचे नकाशा उपलब्ध करुन घेतल्यावर असे निदर्शनात आले की, पहिल्या नकाशात नायगाव-भाईंदर पुल हा रेल्वे मार्गालाधरुन समांतर पुल दाखविण्यात आला तर दुसर्‍या नकाशात तो नायगाव कोळीवाड्याकडून वळसा घालुन पुढे तो वसई-विरारला जावून मिळत असल्याचे नकाशात दाखविण्यात आले आहे. नायगाव कोळवाड्यातील नागरिकांचा प्रस्तावित खाडी पुलाला विरोध नाही परंतु प्रस्तावित पुलास वळसा दिल्याने मच्छिमार बांधव मच्छि सुकत घालत आहे ती जागा आणि मुलांचे खेळाचे मैदानाची जागा बाधीत होत आहे. हा पुल झाला तर मच्छिमार बांधव मच्छिकुठे सुकविणार आणि मुले कुठे खेळणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यासाठी संबंधीत प्राधिकरणांनी थेट कोळीवाड्यातील बांधवांशी संपर्क केला असता तर दोन्ही प्रश्‍नावर मार्ग काढला गेला असता परंतु सोसायटी संचालकांच्या मनमानी कारभारामुळे वसई-भाईंदर खाडीपुलाचे काम रखडणार की, काय अशी चर्चा होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *