
अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांचा विश्वास
प्रतिनिधी
विरार- वसई-विरार महापालिकेतील सर्वच्या सर्व जागा निवडून आणणार, असे दावे-प्रतिदावे केले जात असताना या तोंडवाफाळ बुडबुड्यांना वसई भाजपचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी टाचणी लावली आहे. कुणी कितीही दावे केले तरी या वेळी वसई भाजप ‘स्विंग` घेईल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकांवर ‘ओबीसीआरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विरजण पडले आहे. पालिकेच्या निवडणुका दृष्टिपथात नसल्या तरी विरोधी पक्षांकडून ‘विजयाची विमाने
उडवली जात आहेत. काहींनी तर या वेळी सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आणून ‘रेकॉर्ड` करणार, असे बुडबुडे सोडले आहेत.
या सगळ्यांचा समाचार घेताना वसई भाजपचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी भाजपवर प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. वसई-विरारकरांना आतापर्यंत पर्याय नव्हता. त्यामुळेच आतापर्यंत विरोधक असे छातीठोक बुडबुडे सोडू शकले, अशी टीका शेख यांनी केली आहे. पण यापुढे असे होणार नाही. भाजपच्या निमित्ताने वसई-विरारकरांना ‘सक्षम पर्याय` मिळाला आहे. भाजप हा संघटनेवर आणि कार्यकर्त्यांच्या कामावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. भाजप केलेल्या कामाचे ढोल बडवत नाही. भाजप कार्यकर्ते आणि संघटनांचे काम सुप्तावस्थेत सुरू असते. ते जनतेपर्यंत पोहोचलेले आहे, अशी माहितीही शेख यांनी दिली.
वसई-विरारकरांनाही आता पर्याय हवा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या निमित्ताने शिवसेनेच्या निमित्ताने तो उपलब्ध होता. मनावर घेतले असते तर शिवसेना परिवर्तन आणू शकली असती. पण ‘दरबारी मुजरा` करणाऱ्यांनी ही संधी घालवली आणि पुन्हा एकदा वसई-विरारकरांचा समस्यांच्या गर्तेत कडेलोट केला.
पण असा दगाफटका भाजप कदापि करणार नाही. या महापालिका निवडणुकांनिमित्ताने भाजप अन्य पक्षांसमोर सक्षम पर्याय म्हणून उभा राहील, अशी आशा आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता प्राणपणाने काम करत आहे. त्यामुळे येणारा काळच विरोधकांना त्यांच्या दाव्यांत किती दम होता हे दाखवून देईल. मुळात असे दावे करण्याआधी दावेकरांनी आपण वसई-विरारकरांना आतापर्यंत काय दिले? असाही प्रतिशोध घ्यायला हवा होता, अशी कोनटोचणीही सरतेशेवटी शेख यांनी विरोधी पक्षांना दिली आहे.