

प्रतिनिधी :
वसई भूमी अभिलेख कार्यालयात अत्यंत अनागोंदी कारभार चालू आहे. उप अधीक्षक रणजीत देशमुख यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत दाखल तक्रारीवर चौकशी चालू असून जिल्हा अधीक्षकांनी वरिष्ठांना अहवाल पाथविला आहे. रणजीत देशमुख यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे बोलले जाते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई भूमी अभिलेख कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार चालत असून या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट पहावयास मिळतो. भूखंड मोजणीचे सर्रास सर्व व्यवहार हे दलालांच्या माध्यमातून होतात. दलालांची मोजणीची कामे लवकर होतात तर सामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत. मनसेचे वसई तालुका ग्रामीण उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी जमीन मोजणीकरिता अर्ज केला होता. मोजणी झाली मात्र अहवाल व मोजणी नकाशा दिला जात नव्हता. वारंवार फेऱ्या मारून पाठपुरावा करून ही मोजणी नकाशा दिला जात नसल्यामुळे वैतागून प्रशांत धोंडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकले. सदर प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात भादंविसक ३५३, ३४१, ३४२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाव मौजे सांडोर सर्वे नंबर १६४, १६६ ची हद्द निश्चित करणेसाठी मंडळ अधिकारी माणिकपूर यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला दि. ३०/१२/२०२१ रोजी पत्र दिले होते. कनिष्ठ अधिकारी हे नियमांचे उल्लंघन करून आरोपींशी संगनमत करून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वागत नसून ते शासकीय कर्तव्य बजावत नाहीत. त्यामुळे रणजीत देशमुख, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालय वसई यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १६६ अ, २०१, २१७, २१८, २१९, ४०९, १२० बी, ४२०, ४१७ व दप्तर दिरंगाई कायदा २००७, लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १३, २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यापूर्वी मंजुरी मिळणेसाठी वकील श्रीमती एस. टी. वाळुंज यांनी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांना नोटीस पाठविली आहे. सदर प्रकरणी दि. ३०/३/२०२२ रोजी रणजीत देशमुख यांना जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पालघर येथे चौकशीकरिता बोलावण्यात आले होते. सदर बाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात रणजीत देशमुख यांच्यावर काय कारवाई होते ते स्पष्ट होईल.
दरम्यान वसई भूमी अभिलेख कार्यालयाकडून महत्वाचे कागदपत्रे जाळण्यात आल्याचे वृत्त असून अनेक गटबुक फाडण्यात आले आहेत. सदर प्रकरणी ही चौकशी करून रणजीत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.