अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे व असते.

दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

श्री. सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, ठाणे यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवार दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी मेसर्स जे. जे. सिझनिंगअँड स्पाइसेस, नायगाव, वसई (पूर्व), जिल्हा पालघर या ,”उत्पादक” अन्न आस्थापनातून हळद पावडर (वजन 3402 किलो), धनिया पावडर (वजन 519 किलो), जेरालू पावडर (वजन 628 किलो), जलजीरा पावडर (वजन 1258 किलो), गरम मसाला (वजन 1069 किलो), चिकन मसाला (वजन 606 किलो), किचन किंग मसाला (वजन 838 किलो),अप मसाला (वजन 678 किलो), आचार मसाला (वजन 1873 किलो), चिवडा मसाला (वजन 2798 किलो), चटपटा मसाला (वजन 123 किलो), लाल मिरची पावडर (वजन 796 किलो), व्हाईट चायनीज मसाला (वजन 398 किलो), शेजवान मसाला (वजन 96 किलो) तसेच मालवणी मिक्स मसाला (वजन 13 किलो) असा एकूण रुपये 53,77,322/- एवढ्या किमतीचा अन्नपदार्थाचा साठा तो भेसळयुक्त असल्याचा संशयावरून जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 हा जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कायदा असून त्याचे प्रमुख उद्दिष्ट जनतेला सकस, निर्भय व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच असल्याने सदर कायद्यातील तरतुदींचे संबंधित अन्न व्यवसाय चालकाकडून तंतोतंत व काटेकोर पालन होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. मात्र तपासणीचे वेळी सदर अन्न आस्थापनाने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी निर्धारित केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केलेली नसल्याने, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी निर्देशित केल्याप्रमाणे संबंधित अन्न आस्थापनेत कार्यरत असलेल्या व्यक्तींनी फास्टट्रॅक ट्रेनिंग घेतलेले नसल्याने, संबंधित अन्न आस्थापनाने विक्रीसाठी उत्पादित केलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाचे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या एन ए बी एल प्रयोगशाळेकडून तपासणी किंवा विश्लेषण करून घेतलेले नसल्याने, संबंधित अन्न आस्थापना अन्नपदार्थ विक्रीसाठी उत्पादित करताना उपयोगात आणलेल्या – उपयोगात आणल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे ते वापरापूर्वी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या एन ए बी एल प्रयोगशाळेकडून तपासणी किंवा विश्लेषण करूनच घेत नसल्याने, संबंधित अन्न आस्थापना “उत्पादक” या वर्गवारीत व्यवसाय करीत असल्याने कोणत्याही अन्नपदार्थाची खरेदी किंवा विक्री परवानाधारक आणि किंवा नोंदणीधारक अन्न आस्थापनाकडून किंवा अन्न आस्थापनांना करणे व त्या अनुषंगाने अभिलेखा ठेवणे आवश्यक असताना पुरवठा किंवा विक्री केलेल्या अन्न आस्थापनांच्या परवाना किंवा नोंदणी याबाबत कोणताही अभिलेखा ठेवलेला नसल्याचे आढळून आल्याने तसेच सदर अन्न आस्थापनात अन्नपदार्थांची प्रत्यक्ष हाताळणी करणाऱ्या कामगारांचे ते त्वचारोग आणि किंवा संसर्गजन्य रोग यापासून मुक्त आहेत किंवा कसे याची खात्री व खातरजमा करण्यासाठी त्यांची प्राधिकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक व गरजेचे असताना संबंधित अन्न आस्थापनाकडून कोणत्याही कामगारांची त्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नसल्याने सदर अन्न आस्थापनास संबंधित त्रुटींची पूर्तता होईपर्यंत त्यांचा व्यवसाय बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश घटनास्थळावर देण्यात आलेले आहेत.

अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिकांचा परवाना व नोंदणी) नियमन, 2011 चे नियमन २.१४.१ अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या वाजवी निर्देशांचे पालन करणे संबंधित अन्न व्यवसाय चालकावर बंधनकारक असून निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास आणि किंवा पालन करण्यात कसूर करण्यात आल्यास सदर बाब अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चे कलम 55 अंतर्गत शिक्षा पात्र असून त्यासाठी जास्तीत जास्त रुपये दोन लाखापर्यंत दंडाचे प्रावधान आहे.

सदर अन्न आस्थापनातून एकूण वीस अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येईल.

सदरची कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री. संजयजी राठोड यांचे आदेश व श्री अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सदर कार्यवाही श्रीमती धनश्री ढाणे, अन्न सुरक्षा अधिकारी, पालघर यांनी केलेली असून सदर कामी त्यांना अन्न सुरक्षा अधिकारी, पालघर सर्वश्री प्रवीण सूर्यवंशी, दत्ता साळुंखे व योगेश ठाणे यांनी सहकार्य केले.

जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासह अन्नविषबाधे सारखी अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रशासनामार्फत नियमितपणे अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे घेण्यात येणार आहेत.

“खाद्यतेल उत्पादक” यानी खाद्यतेलाचे पैकिंग करने कामी एकदा उपयोग आणलेल्या टिनांच्या डब्यांचा खाद्यतेलाच्या पॅकिंग करण्यासाठी पुनर्वापर करू नये, कोणत्याही खाद्यतेलाचे पॅकिंग करताना विहित दर्जाच्या बी. आय. एस. ग्रेडच्याच टीनाच्या डब्यांचा उपयोग करावा, खाद्यतेलाच्या सर्वांगीण व सर्वकश तपासणी व विश्लेषणासाठी स्वतःची अद्यावत इन हाऊस (अंतर्गत) प्रयोगशाळा ठेवावी. कोणत्याही खाद्यतेलाची लूज, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरूपात विक्री करू नये. अन्नपदार्थ हाताळणीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक कामगारांचे ते संसर्गजन्य रोग आणि किंवा त्वचारोग यापासून मुक्त आहेत याची खात्री व खातर जमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. “मिठाई” या अन्नपदार्थाच्या किरकोळ विक्रेत्यांनी सुट्ट्या स्वरूपातील मिठाईच्या ट्रेवर सदर मिठाई कोणत्या तारखेपर्यंत वापरावी याबाबतचा स्पष्ट उल्लेख नेहमी करावा. प्रत्येक उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी 25 कामगारामागे एका व्यक्तीला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत फास्टट्रॅक ट्रेनिंग प्राप्त करून घ्यावे. जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाद्यतेला व्यतिरिक्त इतर उत्पादकांनी त्यांनी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थाचे बॅच निहाय तपासणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या एन. ए. बी. एल. प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी. प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने बिलावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत त्याला मंजूर करण्यात आलेला परवान्याचा क्रमांक न चुकता नमूद करावा तसेच सदरचा परवाना सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फोटो फ्रेम करून लावावा. उत्पादक,आयातदार, वितरक यांनी कोणत्याही अन्नपदार्थाची विनापरवाना किंवा विनानोंदणी अन्न आस्थापकडून खरेदी करू नये किंवा विनानोंदणी किंवा विनापरवाना अन्न आस्थापनांना कोणत्याही अन्नपदार्थाची कोणत्याही परिस्थितीत विक्री करू नये. प्रत्येक अन्न व्यवसायाचालकाने त्याच्या दुकानात व परिसरात अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचा परवाना व नोंदणी) २०११ अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण स्वच्छता राखावी असे नम्र आवाहन श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न) कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, ठाणे यांनी जनहित व जन आरोग्य विचारात घेता केलेली आहे.

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत आणि किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांनी जनतेस केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *