

वसई : लॉकडाउनच्या काळात अन्य रुग्णांची होणारी ग़ैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्थानिक डॉक्टरांना त्यांची क्लिनिक आणि नर्सिंग होम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करून त्यांच्यावर करवाई करण्याचे संकेत होते.
मात्र वसई-विरारमधील डॉक्टरांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश धुडकावले असल्याचे निदर्शनास येत आहे. वसई- येथील अनेक क्लिनिक तर आजही बंद आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यामुळे खासगी क्लिनिक आणि नर्सिंगही बंद करण्यात आली होती; मात्र यामुळे अन्य आजारांच्या रुग्णाना समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या डॉक्टरना आपले दवाखाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते; या निर्देशांनंतरही जे डॉक्टर दवाखाने सुरू ठेवणार नाहीत त्यांच्यावर करवाई करण्याचे संकेत दिले होते.
त्यानंतरही वसई-विरार शहरातील अनेक डॉक्टर गायब आहेत. वसई- येथे अनेक डॉक्टर आजही येत नसल्याने दवाखाने उघडे ठेवणाऱ्या डॉक्टरवर रुग्णाचा भार येत आहे. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरसोबतच रुग्णही मेटाकुटीस आले आहेत.
त्यामुळे दवाखाने आणि नर्सिंग होम बंद ठेवणाऱ्या डॉक्टरचे रजिस्ट्रेशन रद्द करून हे दवाखाने कायमचे बंद करण्याची मागणी येथील संतप्त नागरिकांकडून होत आहे. यातील काही डॉक्टरची यादीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मेलद्वारे सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, एका रुग्णाने डिसोझा नर्सिंग होमशी संपर्क केला असता डॉक्टर येत नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या भीतीने नर्सिंग होम बंद असून; लांब लांबहून रुग्ण येत असल्याने डॉक्टरांनी काळजी म्हणून नर्सिंग होम बंद ठेवल्याची माहिती नर्सिंग होममध्ये उपस्थित व्यक्तीने दिली.
