वसई : (प्रतिनिधी) : पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी विनाकारण रस्त्यांवर भटकणार्‍या वाहनचालकांवर जप्तीचे आदेश दिल्यानंतर पालघर जिल्हा व वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. याचदरम्यान वसई वाहतूक पोलीसदेखील कारवाईच्या बाबतीत पुढे आहेत. 15 मार्च ते 5 मे दरम्यान वसई वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करून सुमारे 11 हजार 787 केसेस दाखल केल्या आहेत. तसेच 1 हजार 602 वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे 61 ला 57 हजार 800 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस दाखल करूनदेखील बेशिस्त वाहनचालक रस्त्यांवर मोकाटपणे उनाडक्या करत फिरत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सध्याच्या करोनाच्या काळात सर्वच खाजगी व सार्वजनिक व्यवहार बंद आहेत. वाहतूकीला देखील मज्जाव करण्यात आला आहे. करेानाची साखळी तोडण्यासाठी शासनाला जे जे प्रयत्न महत्वाचे वाटत होते ते ते सर्व प्रयत्न शासनाने करून पाहिले आहेत. मात्र अनेकदा शासकीय पातळीवरून आवाहन करूनदेखील बेशिस्त नागरिक, वाहनचालक रस्त्यावर उनाडक्या करत फिरत असल्याने करोनासारख्या आपत्तीचा धोका वाढला आहे. पालघर पोलीस दलाचे अधीक्षक गौरव सिंग यांनी बेजबाबदार नागरिकांवर, वाहनचालकांवर थेट कारवाईचे आदेश दिल्यानंतर आत्तापर्यंत अनेक मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने जप्त करण्यात आली आहेत. वसई वाहतूक विभागाने दिनांक 15 मार्च ते 5 मे दरम्यान केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. वसई वाहतूक विभागाच्या या कारवाईनंतर नागरिकांचे निदान धाबे दणाणतील आणि ते विनाकारण रस्त्यांवर वाहने घेऊन फिरणार नाहीत, अशी खात्री वसई वाहतूक विभागाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *