मुंबई व ठाणे परिसरातील पाणथळ जागांचे अस्तित्व नष्ट करण्याचा उद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू असताना आता वसई-विरार भागातील पाणथळ जागांकडे काही मंडळींची वक्रदृष्टी गेली आहे. माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाणथळ जागांवर भराव टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वसई तालुक्यातील नायगाव पश्चिमेकडील ‘बीएसएनएल’ टेलिफोन एक्सचेंजच्या लगत असणाऱ्या पाणथळ जागेवर गेल्या काही दिवसांपासून भराव टाकण्याचे काम सुरू आहे. ‘वनशक्ती’ या संस्थेने या प्रकरणी माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असली तरी तक्रारीची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. या कामामुळे हायकोर्टाने २०१३साली दिलेल्या आदेशाचा भंग झाला आहे. त्याचबरोबर सीआरझेड कायदा व २०१०सालच्या पाणथळ जागांच्या जतनाबाबतच्या नियमांचाही भंग झाल्याचा दावा ‘वनशक्ती’ ने केला आहे. हा भराव न काढल्यास हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशाराही संस्थेने दिला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरासह वसई-विरार या भागातील पाणथळ जागा बळकावण्याचे प्रकार कसे सुरू आहेत, यावर ‘मटा’ ने यापूर्वीच प्रकाश टाकला होता. विशेष करून वसई आणि लगतच्या भागात हे उद्योग जोरात सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *