सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
आमदार किरण पावसकर यांच्याकडून विधान परिषद सभागृहात लक्षवेधी सादर

प्रतिनिधी

मुंबई : वसई-विरार महापालिका परिवहनची बस सुविधा व्यवस्थित नसल्याने नवीन कंत्राटदार नेमून बस सुविधा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विधान परिषद सदस्य किरण पावसकर यांनी वसई-विरार परिवहन सेवा व कामगार यांच्या किमान वेतनाबाबत 28 फेब्रुवारी रोजी सभागृहात लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. तर नवीन कंत्राटदार नेमणार असाल तर जुन्या कामगारांना सेवेत रुजू करणार का व त्यांना वेतनवाढ देणार का? या प्रश्‍नावर एकनाथ शिंदे यांनी, विधान भवनात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे उत्तर दिले आहे.

वसई-विरार शहर महापालिकेने परिवहन सेवेच कंत्राट भागीरथी ट्रान्सपोर्टच्या मनोहर सकपाळ यांना दिले आहे. या बसेसवर 700च्या आसपास वाहक व चालक आहेत. या चालक व वाहकांना काही महिन्यांपासून वेळेत पगार दिला जात नाही. तसेच शंभरहून अधिक कामगारांचा दोन महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. कामगारांच्या वेतनातून कापलेले पीएफचे पैसे अजूनही खात्यावर जमा केलेले नाहीत. सहा महिन्यांनी 500 रुपये प्रमाणे वाढणारा पगार गेल्या तीन वर्षांपासून वाढलेला नाही. त्यामुळे वसई-विरार शहर महानगर पालिकेतील परिवहन सेवेतील कर्मचार्‍यांचे थकित असलेले वेतन व वेतन वाढीबाबत न्याय मिळावा, यासाठीची लक्षवेधी विधान परिषद सभागृहात चर्चेसाठी आली होती. समर्थन या सामाजिक संस्थेने आमदार किरण पावसकर यांच्या माध्यमातून या लक्षवेधीवर सभागृहाचे लक्ष वेधले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *