पत्रकारितेतून समाजकारण, समाजकारणातून राजकारणाकडे वाटचाल

वसई :
वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ (ड) मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत एक वेगळेच चित्र दिसून येत आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वच्छ प्रतिमा, निर्भीड पत्रकारिता आणि जमिनीवर केलेल्या कामाच्या जोरावर अपक्ष उमेदवार युसुफ अली बोहरा हे मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

वसईतील हुसेनी कॉलनी, भाभोळा येथे वास्तव्यास असलेले युसुफ अली बोहरा हे पेशाने पत्रकार असून सध्या वकिलीचे शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेत सक्रिय असून सामान्य नागरिकांच्या समस्या केवळ मांडणारेच नव्हे, तर त्यावर प्रत्यक्ष उपाय घडवून आणणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

साप्ताहिक “स्वतंत्र सागर” आणि “सैफ न्यूज लाईव्ह (SAIF NEWS LIVE)” या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, गटार व सांडपाणी व्यवस्था, स्ट्रीट लाईट्स, तसेच वाढत्या अनधिकृत बांधकामांसारख्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. यामध्ये सत्ताधारी, विरोधक आणि जबाबदार अधिकारी यांच्यावरही त्यांनी कोणताही दबाव न घेता प्रश्न उपस्थित केले.

विशेष म्हणजे कोविड काळात खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अवाजवी बिलवसुलीविरोधात त्यांनी उघडलेली मोहीम वसई–विरारमध्ये आजही चर्चेचा विषय आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मनपा व शासनाला हस्तक्षेप करावा लागला आणि तब्बल जवळपास तीन कोटी रुपयांची रक्कम रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना परत देणे रुग्णालयांना भाग पडले. हा संघर्ष केवळ बातमीपुरता मर्यादित न राहता, प्रत्यक्ष दिलासा देणारा ठरला.

“राजकारण हे पदासाठी नव्हे, तर प्रश्न सोडवण्यासाठी असते,” ही भूमिका मांडत युसुफ अली बोहरा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी ‘पेन व निब’ (Pen & Nib) या चिन्हावर मतदान करून स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला संधी द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

पक्षीय गणितांपेक्षा कामाची पावती, निर्भीडपणा आणि लोकांमधून आलेला उमेदवार अशी ओळख असलेले युसुफ अली बोहरा सभागृहात गेले, तर प्रभाग २५ च्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने आवाज मिळेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

“आपलाच, जमिनीवर काम करणारा, आपल्या मधीलच उमेदवार” अशी ओळख घेऊन मैदानात उतरलेले युसुफ अली बोहरा मतदारांचा विश्वास किती मिळवतात, याकडे आता संपूर्ण वसई–विरारचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *