वसई-विरार महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे टोलेजंगी इमारतींचे रान असलेले शहर वारंवार पाण्याखाली जात आहे. या पूरपरिस्थितीत नागरिक व व्यापारी सातत्याने बळी जात आहेत. गेले दोन दिवस पावसामुळे चौथ्यांदा वसईचे जनव्यवहार विस्कळीत झाले असून वसई विरार महापालिकेने 12 कोटी खर्च करून निरी व आयआयटी या तज्ज्ञ समितीचा अहवाल तर मिळवला, पण त्याची अंमलबजावणी बोगस पद्धतीने केल्याचा आरोप नवघर माणिकपूर शिवसेनेने केला आहे.
महापालिकेने नेमलेली सत्यशोधन समिती जशी बोगस होती, तसेच निरी आणि आयआयटी या तज्ज्ञ समितीच्या अहवालावर झालेले काम देखील बोगस आहे. महापालिका आयुक्तांनी या अहवालात जे काम सांगितले आहे ते नेमके न करता, अर्धवट आणि कंत्राटदार, संधीसाधू राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना त्याचा लाभ घेता यावा, अशा सोयीच्या दृष्टीने केल्याचा आरोप शिवसेनेचे उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेने 12 कोटी खर्च करून निरी आणि आय आय टी कडून भविष्यात पावसाळ्यात वसई बुडू नये, म्हणून काय काय उपाययोजना कराव्यात? यासाठी प्राथमिक अहवाल स्वीकारला. परंतु त्या अहवालात 2019 च्या पावसाळ्यापूर्वी जी प्राथमिक कामे करण्यास सांगितली होती. त्यापैकी फक्त नाले आणि खाड्या यांची रुंदी वाढवण्याचे काम महापालिकेने केले असून मात्र त्यातील गाळ बाजूलाच काढून ठेवला, की जो या पावसाळ्यात पुन्हा नाले आणि खाडीमध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे नालेसफाईवर जनतेचा पैसा पुन्हा पाण्यात गेला आहे. तो गाळ उचलून अन्यत्र नेणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही, असा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.
अहवालात नैसर्गिक नाले ,खाड्या यांची रुंदी, खोली पूर्ववत करावी, अशी सूचना आहे. त्यामुळे त्या नाल्याची रुंदी आणि खोली नेमकी किती करावी ? हे महापालिकेने निविदा काढताना त्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख करणे टाळले आहे. जेणेकरून कंत्राटदार, संधीसाधू राजकारणी आणि प्रशासनामधील अधिकारी यांना त्याचा पुन्हा लाभ घेता यावा, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
……………………………
तांत्रिक दृष्टीने जे काम होणे आवश्यक होते ते झाले नाही त्यामुळे वसई बुडत असून, दि. 3 आणि 4सप्टेंबर रोजी 210 मि मी पावसात वसई जलमय झाली आहे. वसईत दोन /तीन दिवस पाऊस पडला की पाऊस थांबूनही चार पाच दिवस पाण्याचा निचरा होत नाही .
– मिलिंद चव्हाण, शिवसेना उपशहर प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *