
वसई (प्रतिनिधी)- गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्यात याव्यात असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत.शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात अशी नियमावली देखील जाहीर करण्यात आली. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र देखील मागण्यात आले.परंतु काही जिल्ह्यांत शिक्षकच कोरोनाबाधित आढळल्यानंतर पालकांपुढे पाल्याच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.शिवाय दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा प्रभाव वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी खबरदारी म्हणून मुंबई, पुणे,नाशिक सह वसई विरार मधील शाळाही ३१ डिसेंबर पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शाळा आता नवीन वर्षातच उघडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.वसई विरार पालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर, तारापूर औद्योगिक परिसराचे क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रातही ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद राहणार आहेत.पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देशानुसार काल जिल्हयातील इयत्ता ९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा सुरु करणेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शाळा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी सांगितले. यावेळी जिल्हयातील लोकप्रतिनिधीसह वसई विरार पालिका आयुक्तांशी शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.
मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.त्यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे.
दुसरीकडे वसई विरार मधील कोरोनाचे विघ्न पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. वर्ग सुरू करताना शारीरिक अंतराचे पालन करण्याचे आदेश असले तरी एका बँचवर एक विद्यार्थी या पद्धतीने नियोजन करताना शाळा व्यवस्थापनांना घाम गाळावा लागणार आहे. वसईतील महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात प्रचंड यातना सोसल्या. दबाव आणि ताण असताना आपले काम चोखपणे पार पाडले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला वसईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणदेखील कमी झाला आहे. मात्र दिवाळी सणानंतर कोरोना रूग्णांच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. वाढते प्रमाण चिंता उपस्थित करणारे असून या विघ्नाच्या सावटाखाली शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेषत्वाने प्रशासनाला काळजी वाहावी लागणार होती.त्यामुळे या सर्व बाबींचा सारासार विचार करून प्रशासनाने वसई विरार मधील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
