वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मध्ये कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयांकडून सर्रासपणे लूटमार सुरू असल्याचे समोर येत आहे. या
रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली लाखोंची बिले दिली जात आहेत.एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही दुसरीकडे अशा प्रकारे कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार सुरू आहे.
परंतु या रुग्णालयांविरोधात पालिका प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीच कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील प्रत्येक बिलाचं ऑडिट होणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे,असे असताना
ही वसई विरार पालिका इतकी उदासीन का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वसई विरार शहरात कोरोना रुग्णालये म्हणून काही खाजगी रुग्णालयांना उपचार करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. त्यांना कोणत्या दराने बिल आकारावे याबाबत शासन अधिसूचनेत नमूद वैद्यकीय सेवा-सुविधा पुरवणे,आकारणी करणे बाबत शासन निर्णय दिनांक १४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे व त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करून खासगी रुग्णालयात सेवा-सुविधांची दर निश्चित करण्यात आलेले आहेत. ते सर्व दर कोविड रुग्णालय यांना लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णालये यांनी शुल्क, दर घेणे आवश्यक आहे. पण असे असताना देखील काही खाजगी रुग्णालयातून काही  रुग्णांकडून जादा दर लावून खर्च वसूल केल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे साहेब यांनी २ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत
वसई विरार मधील पालिकेचे अधिकारी , वैद्यकीय तज्ञ यांची एक समिती गठीत करून ही समिती खासगी रुग्णालयामधील कोरोना रुग्णांना दिली जाणारी बिले तपासतील व त्यानंतर रुग्णांना बिल दिले जाईल , या बिलांचे ऑडिट होईल असे जाहीर केले होते. मात्र गेल्या २५ दिवसात पालकमंत्र्यांनी अशी कोणतीही समिती स्थापन केलेली नाही किंवा वसई विरार मधील एकाही रुग्णालया
वर कारवाई केलेली नाही.शिवाय पालिकेनेही कोणतेही पाऊल आजवर उचलले नाही. वास्तविक वसई विरार महापालिका हद्दीत एकूण किती खासगी रुग्णालये आहेत ? त्यातील किती खासगी रुग्णालये पालिकेने कोविड रुग्णालये म्हणजेच कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी घोषित केली आहेत ? तेथे दरपत्रक काय ठरवले आहे ? तेथील रुग्णांना जी बिले दिली जात आहेत ती पालिकेने तपासली का ? पालिकेने खासगी रुग्णांना जे दरपत्रक ठरवून दिले आहे , त्याची अंमलबजावणी होते कि नाही हे पहिले आहे का ? त्यावर पालिकेचे कोणते नियंत्रण आहे का ? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यातच दोन – तीन लाख रुपयांची बिले कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जात आहेत. यावरून सद्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे

खासगी रुग्णालयातील बिलाचं ऑडिट कधी ?

दुसरीकडे खासगी रुग्णालयांमधील प्रत्येक बिलाची तपासणी केली जाईल , असे आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे वसई विरार पालिकेकडे अशा एकूण किती रुग्णालया बाबत जादा बिलाच्या तक्रारी आजवर आल्या ? गेल्या २५ दिवसात पालिकेने समिती का स्थापन करून कारवाई केली नाही ? राज्य सरकारने ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ लागू केली आहे. या योजना सर्वच रुग्णालयामध्ये लागू होणे गरजेचे आहे. या योजनांची माहिती गरजूपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. वसई विरार हद्दीत जेथे या योजना लागू आहेत त्या रुग्णालया मध्ये या योजनेचा माहिती देणारा बोर्ड , त्याची माहिती लावण्यात आलेली नाही.आजवर वसई विरार पालिकेने गेल्या २५ दिवसात खासगी रुग्णालयामधील कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली दिसली नाही. खासगी रुग्णालयामध्ये जी बिले दिली जात आहेत , त्यावर पालिकेने नियंत्रण ठेवावे , सर्व बिलांची तपासणी करावी , वसई विरार मधील जे कोरोना रुग्ण खासगी रुग्णालया मध्ये दाखल आहेत अशा नागरिकांच्या माहितीसाठी पालिकेने आवाहन प्रसिद्ध करून कोरोना रुग्णांची होणारी लूट थांबवावी , त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर करावे अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे.तसेच पालिकेचे लेखा परीक्षक , वैद्यकीय आरोग्य अधीकारी विभागाने जादा बिलाबाबत तात्काळ कारवाई सुरु करून जादा बिले आकारलेल्या नागरिकांना त्यांची रक्कम परत करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *