
पत्रकारितेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर, लो. टिळकांचे आदर्श जपणे गरजेचे
—- अनिलराज रोकडे, अध्यक्ष : महानगर पत्रकार संघ
वसई, दि.6(वार्ताहर ) वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे आज सायंकाळी वसई येथे आयोजित पत्रकार दिन समारंभात आद्य समाजसुधारक, तथा मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक स्व. बाळशास्त्री जांभेकरांना मानवंदना देण्यात येऊन, त्यांच्या एकंदर योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रबोधन, लोकशिक्षण आणि सामाजिक जागृतीच्या उद्देशाने दर्पणकार बाळ शास्त्रीनी सुरु केलेली पत्रकारिता व्यवसायनिष्ठा आणि स्पर्धेच्या रेट्यात आज प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत असून, तिचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी जांभेकर, लो. टिळक, आगरकर यांचे आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ‘वसई विरार महानगर पत्रकार संघां’चे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी यावेळी केले.
प्रारंभी पत्रकार संघांचे पदाधिकारी, तथा दै. लढाई न्यायासाठी चे संपादक झाकीर मेस्त्री यांच्या हस्ते स्व. बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्यांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. अनिष्ट रूढी, परंपरा या विरोधात जनजागृती करीत, विधावांच्या पुनरविवाहासाठी चळवळ उभी करणाऱ्या स्व. जांभेकरांनी जातीभेद, वर्णभेद, सामाजिक विषमता, महिला दास्य, बाल विवाह, अंधश्रद्धा या विरोधात दर्पण मधून रणशिंग फुंकले. लोकशिक्षण आणि सामाजिक जागृतीला पुरक वातावरण निर्माण व्हावे, म्हणून ग्रंथालय उभारण्यात पुढाकार घेऊन वाचक चळवळ रुजवली. पहिले संपादक, पहिले प्राध्यापक, पहिले प्रकाशक, संशोधक, संस्कृत, विज्ञान आणि गणित विषयातील तज्ज्ञ अश्या विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या जांभेकरांना दुर्दैवाने आयुष्य खूप कमी लाभल्याची खंत रोकडे यांनी यावेळी व्यक्त केली.
स्व. बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रज राजवटीतील प्रतिकूल कालखंडात दर्पणच्या माध्यमातून जनतेला स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याचे बाळकडू पाजले. अज्ञान, विषमता यातून निर्माण झालेली सामाजिक दरी मिटविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि त्यांचे योगदान पत्रकारितेतील नव्या पिढीला विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन झाकीर मेस्त्री यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन जयराज राजीवडे यांनी, तर आभार प्रदर्शन बसंत आग्रहारी यांनी केले.