

आमदार हितेंद्र ठाकूर समर्थकांचे प्रयत्न फ़ळाला
प्रतिनिधी
विरार – वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार खंडेराव पवार यांची नियुक्ती झाली आहे. अनिलकुमार पवार हे सिडकोमध्ये कार्यरत होते. गंगाथरन डी. यांची नियुक्ती मंत्रालयात उपसचिव पदावर झाल्याने त्यांच्या जागी अनिलकुमार पवार यांची नियुक्ती झाली आहे. गंगाथरन डी. यांच्या बदलीची चर्चा मागील काही दिवस वसई-विरार शहरात होती. त्यामुळे आयुक्त पदाकरता अनिलकुमार पवार हेच दावेदार असतील, अशीही जोरदार चर्चा होत होती. आजअखेर ही चर्चा खरी ठरली आहे.
अनिलकुमार पवार हे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासोबत असलेले जवळचे संबंध पाहता आयुक्त पदी अनिलकुमार यांच्या झालेल्या नियुक्तीमुळे आमदार हितेंद्र ठाकूर समर्थकांचे मागील आठ-दहा महिन्यांचे प्रयत्न फळाला आल्याचे म्हटले जात आहे.
गंगाथरन ड़ी. यांची आयुक्त पदी नियुक्ती नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतून झाली होती. कोविड-१९ संक्रमण काळात गंगाथरन डी. यांनाच प्रशासक नेमून एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीची कोंडी केली होती. गंगाथरन डी. यांनी बहुजन विकास आघाडीच्या अनेक नेत्यांना पालिकेपासून दूर ठेवले होते.
त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात गंगाथरन डी. यांच्याबाबत अढ़ी निर्माण झाली होती. त्याच वेळी शिवसेना नेत्यांसोबत गंगाथरन डी. मुक्त वावरताना व त्यांना भेटताना दिसत होते. गंगाथरन डी. अन्य पक्षांना सापत्न वागणूक देत असल्याने त्यांच्या बदलीची मागणी बहुजन विकास आघाड़ीसोबतच काँग्रेस व राष्ट्रवादीचे आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी लावून धरली होती.
याशिवाय वसई-विरारमधील सामान्य नागरिकांनाही आयुक्त दाद देत नसल्याने त्यांच्याविरोधात प्रचंड जनक्षोभ होता. गंगाथरन डी. यांची वाढती मुजोरी लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांनी मागील आठ-दहा महिने त्यांच्या ‘उचलबांगड़ी’करता विशेष प्रयत्न केले होते.
दरम्यानच्या काळात गंगाथरन डी. यांच्या बदलीची दोनदा अफवा उठली होती. या अफ़वांसोबत अनिलकुमार पवार यांचे नावही चर्चेत आले होते. आजअखेर या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अनिलकुमार पवार यांची नियुक्ती बहुजन विकास आघाड़ीसह राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेकरता पूरक मानली जात आहे. अनिलकुमार पवार यांनी सिडकोत असताना अनधिकृत बांधकामविरोधी चांगली मोहीम राबवलेली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची मर्जी सांभाळताना ते वसई-विरार शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर कसा वचक ठेवतात व विकासकामांना कसा न्याय देतात? हे येणारा काळच सांगणार आहे.