नालासोपारा :- वसई विरार महानगरपालिका सद्या शहराच्या सौन्द्रीकरणावर भर देत आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ, रस्त्याच्याकडेच्या भिंती, बगीचे यांना रंगरंगोटी बरोबरच त्यावर वेगवेगळी चित्रे रेखाटण्याची काम एकीकडे सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला सहाराच्या चौकाचौकात शहराचे अस्तित्व दाखवणारे पुतळे उभारत आहे. त्याचबरोबर आता शहरात स्मार्ट पोल उभारण्यात येत असून या एका पोलवर अनेक सुविधा नागरिकांना उपलब्ध असणार आहेत.

पालिकेने शहरात स्मार्टपोल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे पोल केवळ दिव्यांच्या पुरता मर्यादित न राहता याचा विविधांगी उपयोग केला जाणार आहे. विशेषतः उभारण्यात येणारे स्मार्टपोल हे पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप या तत्वावर लावण्यात येणार आहेत. या स्मार्ट पोलवर एलईडी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक सूचना देण्यासाठी साउंड, डिजीटल जाहिरात फलक, इंटरनेट बूस्टर लावण्यात येणार आहे. याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या स्थितीत पालिकेच्या क्षेत्रात साधे पथदिवे आहेत. त्याचा फारसा उजेड पडत नाही त्यामुळे आता या पोलवर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. यामुळे आजूबाजूचा परिसर उजळून निघेल याशिवाय विजेची बचतही होणार आहे. या स्मार्ट पोलवर सीसीटीव्ही कॅमेरे ही लावण्यात येणार आहेत. पोलिसांना तपासात याची मोठी मदत होणार आहे.

विविध प्रकारच्या कारणामुळे इंटरनेट सेवा कोलमडून पडते अशा वेळी बसविण्यात आलेल्या इंटरनेट बूस्टरचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व बाबीमधून पालिकेला ही चांगले उत्त्पन्न मिळणार आहे. शहरात ३०० ठिकाणी हे स्मार्ट पोल उभारण्यात येत असून आतापर्यंत जवळपास १०० पोल उभारून झाले आहेत. शहराच्या विविध भागात उभारण्यात येणाऱ्या या स्मार्ट पोलमुले पालिकेला नागरिकांना घरपट्टी भरणे, पाणी येणार नसेल तर त्याची माहिती देणे, तसेच पालिकेच्या विविध योजनांची माहिती एकाच वेळी शहरातील नागरिकांना देता येणार आहे. सद्या शहरात घरपट्टी, पाणी पट्टी भरण्याच्या सूचना देण्यासाठी रिक्षा अथवा इतर गाड्या घेऊन अनाऊंसमेंट करत गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. तो त्रास कमी होणार आहे.

शहरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरात घडणाऱ्या गोष्टीवर पोलिसांना तसेच पालिकेलाही लक्ष ठेवता येणार असल्याची माहिती पालिकेचे बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी लोकमतला दिली.

कोट

मनपा हि अद्यावत साधनांनी सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत . स्मार्ट पोलच्या माध्यमातून शहराच्या सुरक्षेवर आमची नजर असणार आहे. त्याचप्रमाणे या स्मार्ट पोलवर असणाऱ्या साउंडमुळे मुख्यालयातून एकाच वेळी सर्व शहरभर सूचना ही देण्यास मदत होणार आहे. – अनिलकुमार पवार (प्रशासक तथा आयुक्त, वसई विरार महानगरपालिका)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *