

वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या विरार स्थित मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या गाळ्यांपैकी आरोग्य विभागाच्या गोडाऊनला शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये शहरातील सी प्रभागातील फवारणीसाठी ठेवलेली विविध कंपन्यांची औषधे, पंप आदी साहीत्य जळून खाक झाले. काही औषध संदर्भातील कागदपत्रे असलेल्या सर्व फाईली सुद्धा जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी कार्यालयीन वेळेत ही आग लागली असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडून अग्निशमन दलास पाचारण केले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या जळीत घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाही. मात्र, लाखों रुपये किंमतीची औषधं तसेच सी प्रभाग समितीचा एक महिन्याचा औषध साठा आणि महत्त्वाच्या फाईली जळून खाक झाल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता या गोडाऊनला अचानक आग लागल्याचे समजताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. या प्रसंगी पालिका अधिकारी वर्गानी घटनास्थळी जाऊन आगीचा आढावा घेतला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र आगीतून संशयाचा धूर मात्र जरूर येत आहे.