
विरार : वसई-विरार महापालिका परिक्षेत्रातील स्वच्छ्ताविषयक काम असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी आरोग्य निरीक्षकांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मात्र आयुक्तांनी बजावलेली ही नोटीस म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ अशी प्रतिक्रिया पालिका वर्तुळात उमटत आहे.
आगामी पावसाळा आणि त्या अनुषंगाने विहीत मुदतीत करायची कामे व इतर स्वच्छ्ताविषयक करून घ्यायच्या दैनंदिन कामांबाबत आयुक्तांनी ५ मे रोजी आरोग्य निरीक्षकांना पत्र दिले होते.
यात सर्व रस्ते, चौक, फूटपाथ, रस्ता दुभाजक यांची संपूर्ण दैनंदिन स्वच्छ्ता करणे; तसेच रस्त्यावर, रस्त्याकड़ेला व डिवायडरवर पडलेले मातीचे ढिग हटवणे, छोट्या-मोठ्या गटारांतील गाळ काढणे व तो उचलणे, मोठ्या नाल्यांवरील चेंबर उघडून त्यातील गाळ सुरक्षित बाहेर काढणे व त्यांची साफसफाई करणे व हा गाळ उचलणे, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी व्हिप होलची साफसफाई करणे इत्यादी कामांचा समावेश होता.
मात्र वारंवार सूचना करूनही स्वच्छ्ता कामात अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा ठपका आयुक्त गंगाथरन डी. यांनी आरोग्य निरीक्षकांवर ठेवला आहे.
आरोग्य निरीक्षक प्रभागनिहाय स्वच्छ्ताविषयक कामाबाबत ठोस नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करत नाहीत, नागरिकांना स्वच्छतेबाबत सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रार प्राप्त होत आहेत, आपले आपल्या अधिनस्त ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण व योग्य पर्यवेक्षण नसल्याचे निदर्शनास येते, असे विविध आरोप आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान; नालेसफाईतील गाळ आणि मातीचे ढिगारे उचलण्याबाबत ठेकेदाराला त्यांच्या टेंडरमध्ये स्पष्ट अटी आणि शर्थी घालून दिलेल्या असताना; त्यासाठी आरोग्य निरीक्षकांना दोषी धरणे योग्य नसल्याचे मत पालिकेतील सुत्रांनी व्यक्त केले आहे.
यासाठी खरे तर आयुक्तानी ठेकेदारांना नोटीस बजावणे अपेक्षित असताना; जाणीवपूर्वक आरोग्य निरीक्षकांना ‘टार्गेट’ केले जात असल्याने आयुक्तांची नोटीस म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ मानली जात आहे.