
शिवसेनेच्या निवेदनानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

विरार- वसई-विरार महापालिकेच्या भाड़ेत्त्वावरील गाळ्याना प्रत्यक्ष पाहणी करून योग्य दर आकारणी करा, असे आदेश महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
वसई-विरार महापालिकेने केलेली भाड़ेवाढ त्वरित मागे घ्यावी, यासाठी बुधवारी खासदार राजेंद्र गावित, वसई शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, उपजिल्हा प्रमुख प्रविण म्हाप्रळकर, जितेंद्र शिंदे, अतुल पाटील, अनिल चव्हाण, मनीष वैद्य आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत.
पूर्वी अस्तित्वात असलेल्या नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांनी पूर्वापार भाडे तत्वावर दिलेल्या महापालिका हद्दीतील महापालिकेच्या मालकीच्या हजारो गळ्यांची महापालिकेने अचानक ५०/६० पटीने भाडेवाढ केली होती. याविरोधात व्यापाऱ्यांत असंतोष निर्माण झाला होता. या व्यापाऱ्यानी शिवसेनेकड़े आपले दुःख मांडले होते. त्यामुळे शिवसेनेने तात्काळ आयुक्तांची भेट घेऊन भाड़ेवाढ मागे घेण्याची मागणी केली होती.
मासिक भाड़े ३०० ऐवजी ५००० रुपये!
वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग आयमधील मासळी मार्केटमधील एका गाळ्याचे भाडे पूर्वी ३०० रुपये इतके होते; मात्र वसई-विरार महापालिकेच्या नगर रचना विभागाने डिसेंबर २०२० पासून सुधारित रेडीरेकनरनुसार या गाळ्याचे भाडे ५०८२ इतके केले आहे. या संबंधीच्या नोटीस महापालिकेने गाळेधारकांना पाठवून ही रक्कम भरणा करण्याचे आदेश दिले होते; मात्र या अव्वाच्या सव्वा भाडेवाढीविरोधात गाळेधारकांत नाराजी होती.