

प्रतिनिधी विरार : वसई-विरार शहरातील पावसाळापूर्व कामे ३० मेअखेरपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन वसई-विरार महापालिकेच्या वतीने मंगळवारी देण्यात आले. वसई-विरार महापालिका मुख्यालयात मंगळवारी या कामांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांनी विविध कामांवर उहापोह केला.
सर्व प्रभागांतील नालेसफाईची कामे, रेल्वे कलव्हर्टची सफाई प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली.
सोबतच नालेसफाई कामांची व संबंधित ठेकेदार यांची माहिती प्रभाग सभापती यांचे कडे देणे, महसूल, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, बंदरे विकास या विभागांच्या अखत्यारीतील कामे विना विलंब करण्यासाठी त्वरित पत्रव्यवहार करणे, महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्ते दुरुस्ती करणे, लॉकडाउनपूर्वी मार्च महिन्यात शहरात चालू होऊन बंद पडलेली घर, इमारत, इतर आवश्यक दुरुस्तीकरीता त्वरित परवानगी देणे, याची माहिती प्रभाग स्तरावर उपलब्ध करून देणे, तसेच आलेल्या घर, इमारत, दुरुस्ती परवानगी अर्जावर त्वरित निर्णय घ्यावा, आयुक्तांशी संपर्क करण्यासाठी वेळ निश्चित करावी, अशा सूचनाही या वेळी करण्यात आल्या.
या बैठकीस महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी स्थायी समिती सभापती, ज्येष्ठ नगरसेवक अजीव पाटील, माजी सभापती, ज्येष्ठ नगरसेवक पंकज ठाकूर, प्रफुल्ल साने, महेश पाटील व प्रभाग समिती सभापती सखाराम महाडिक (प्रभाग A), भरत मकवाना ( प्रभाग B), यज्ञेश्वर पाटील ( प्रभाग C), निलेश देशमुख ( प्रभाग D), अतुल साळुंखे ( प्रभाग E) सरिता दुबे (प्रभाग F), कन्हय्या (बेटा) भोईर (प्रभाग G), वृंदेश(उमा)पाटील (प्रभाग H), लॉरेल डायस ( प्रभाग I), महिला बाल कल्याण सभापती माया चौधरी, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, शहर अभियंता राजेंद्र लाड व सर्व इंजीनियर उपस्थित होते.