
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

नालासोपारा- वसई-विरार शहरातील रस्तेदुरुस्तीचे काम वसई-विरार महापालिकेने अखेर हाती घेतले आहे. रात्रीच्या वेळात खड्डे बुजवण्यासह पॅचवर्कचे काम पालिकेकडून करण्यात येत आहे. वसई शिवसेनेने सातत्याने ही मागणी लावून धरली होती. शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर या कामाला आता वेग आला आहे.
वसई-विरार शहरातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सततच्या पावसामुळे या कामात व्यत्यय येत असल्याचे कारण पालिकेकडून देण्यात येत होते.
मात्र आगामी गणेशोत्सव व गंभीर अपघात लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर व शिवसेना युवानेते पंकज देशमुख यांनी पालिका आयुक्त गंगाथरन डी. व कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड़ यांची भेट घेऊन केली होती.
या भेटीनंतर या मागणीचा सातत्याने पाठपुरावा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर व शिवसेना युवानेते पंकज देशमुख यांच्या माध्यमातून सुरु होता.
अखेर शिवसेनेच्या रस्ते दुरुस्तीच्या मागणीला प्रतिसाद देत प्राधान्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र रस्ता दुरुस्तीचे काम आत्यंतिक चांगले आणि दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त करून हे काम हाती घेतल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.