
वसई(प्रतिनिधी) : वसई विरार शहर महानगरपालिकेत आगळावेगळा भ्रष्टाचार पहावयास मिळत आहे. कोविड लस न घेताच केवळ नोंदणी करून लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र अंदाजे 3 हजार रुपये घेऊन दिले जात आहे. आयुक्तांनी सदर बाबत सखोल निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
या बाबत अधिक माहिती अशी की, कोविड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सरकारतर्फे मोफत लस दिली जात आहे. वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेतून प्रवास करता येईल, असा नियम सरकारने बनविल्यामुळे काही महाभागांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून डोस न घेता लाच देऊन प्रमाणपत्र मिळविली आहेत, असे खात्रीलायक वृत्त असून या भ्रष्टाचाराची आयुक्तांनी सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.