
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचा पसारा झालेला असून प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचे या अनधिकृत बांधकामांना संरक्षण लाभलेले आहे. प्रभाग समिती आय कार्यालयाकडून अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई होत नाही.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालयाकडून अनधिकृत बांधकामांना कागदपत्र सादर करण्याच्या नोटिसा, एमआरटीपी नोटिसा काढल्या जातात. पुढे कोणतीही कारवाई होत नाही. नोटिसा काढून अनधिकृत बांधकामधारकांकडून अधिकारी मोठी सौदेबाजी करतात. अंदाधुंद भ्रष्टाचार चालू असून सदर बाबत मंत्रालयापर्यंत अर्थात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या तरीही कारवाई केली जात नाही. यावरून मुख्यमंत्र्यांचे हात ही या भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, असेच म्हणावे लागेल.
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना ही तक्रारी करून काहीही उपयोग नाही. हजारों कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा, शेकडो एमआरटीपी नोटिसा प्रभाग समिती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्या बाबत प्रभाग समितीने काय कारवाई केली याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी. फार मोठा भ्रष्टाचार उघड होईल.
मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामांसंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्या याचिकांचे काय झाले. न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे कारवाई झाली की नाही ? महा भयंकर भ्रष्टाचार झालेला असून सर्व आभाळच फाटल्यासारखी स्थिती झालेली आहे.
प्रभाग समिती आय हद्दीत सध्या धुमधडाक्यात अनधिकृत बांधकामे चालू असून या बाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याकडे विचारणा केली असता कारवाई केली जाईल, असे मोघम उत्तर दिले जाते.
प्रत्येक नोटीस व त्या संदर्भात झालेली कारवाई या बाबत चौकशी लावून भूमाफिया व अधिकारी यांना सळो की पळो करून टाकू, असा इशारा युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादक यांनी दिला आहे.