प्रभाग समित्यांवर वसई-विरार शहर महानगरपालिकेचा अंकुश आहे का?
★ निष्क्रीय आणि अनागोंदी कारभाराला मिळतेय खतपाणी
एच प्रभागात

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेचा प्रभाग समित्यांवर वचक कमी असलेला दिसून येत आहे. प्रभाग समिती एच नवघर माणिकपूर विभागीय कार्यालयात सध्या मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आणि निष्क्रीय कारभार सुरु असून यामुळे वसईकर जनता त्रासली आहे. प्रभाग समिती एच कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढणार्‍या अतिक्रमणांमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वसई-विरार शहर महानगर पालिकेकडे वारंवार तक्रार करूनदेखील नागरिकांना होणार्‍या त्रासाकडे जणू डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या या निष्क्रीयतेविरोधात येत्या शुक्रवार 14 जून रोजी भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती एच कार्यक्षेत्रात अतिक्रमणांचे पेव फुटले आहे. नागरिकांच्या रहदारीच्या फुटपाथवरील अतिक्रमणे, फेरीवाल्यांचा वाढता उपद्रव, पार्किंग समस्या, अंबाडी रोडवरील गाडी व्रिकेत्यांचे बेकायदा अतिक्रमण, नालेसफाईतील अनियमितता, बेकायदा बांधकामे या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यास प्रभाग समिती एच निष्क्रीय ठरल्याची तक्रार नागरिकांनी केला आहे. वाढत्या अतिक्रमणाकडे वारंवार प्रभाग समितीचे अधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष वेधूनदेखील त्यांच्याकडून कारवाई शून्य होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे सभापतींच्या कार्यालयासमोर गेल्या आठ महिन्यापासून चार बेकायदा इमारतींचे बांधकाम सुरु आहे. ही बाब निदर्शनास आणूनदेखील एचच्या सहाय्यक आयुक्तांनी साधी नोटीसही का बजावण्यात आली नाही हा प्रश्‍न पडला आहे. या प्रभागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. 122 कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत ठेकेदारांना मदत केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडले आहे. त्यामुळे एकूणच प्रभाग समिती एचच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कार्यतत्परतेबाबत संशय निर्माण होत आहे. याप्रकरणी वसई-विरार महानगर पालिका कारवाईचे पाऊल उचलणार का की या अनागोंदी कारभाराला प्रोत्साहन देण्याचे काम करणार या प्रश्‍नाचे उत्तर त्वरित द्यावे. या निष्क्रीय कारभाराविरोधात शुक्रवार दिनांक 14 जून 2019 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत प्रभाग समिती एचच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *