वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाऱ्या च्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा होणारे घाण पाणी वाहून या जलाशयात जात आहे.

वाडा शहरात गेल्या वर्षभरापासून कचरा भूमीचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. वाडा नगरपंचायतकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अन्य ठिकाणी जागा भाड्याने घेऊन शहरातील कचरा टाकला जातो. या पूर्वी शहरातील कचरा वाडा- भिवंडी या राज्य महामार्गालगत गांध्रे गावानजिक जागा भाड्याने घेऊन टाकला जात होता. मात्र रस्त्यालगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्या वर मोकाट जनावरे येऊन या महामार्गावर अपघात वाढल्याने तसेच या कचरा भूमीमुळे परिसरात दुर्गंधी वाढल्याने ही कचराभूमी बंद करण्यात आली.

वाडा शहरात कचराभूमीसाठी कुठेच जागा उपलब्ध न झाल्याने वाडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर बंधाऱ्यालगतच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीने वाडा शहरातील कचरा टाकण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात या कचराभूमीचा फारसा त्रास कुणाला झाला नाही. मात्र पावसाळा सुरु झाल्यापासून या कचराभूमीतील घाण पाणी थेट वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयात जात आहे.

आधीच वाडा शहराला अत्यंत गढूळ, अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. आता त्यात आणखीन भर दूषित पाण्याची पडू लागल्याने वाड्यातील ३५ हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान या कचराभूमीतून निघणारे घाण पाणी नदीपात्रात जात आहे. नदी प्रवाहीत असल्याने या नदीकडील ऐनशेत, गांध्रे, तुसे या गावातील ग्रामस्थांनी ही कचराभुमी बंद करण्याची मागणी केली आहे.
वाडा शहरवासीयांचे आरोग्य धोक्यातवाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयालगत टाकल्या जाणाºया कचऱ्यामध्ये हॉटेलमधील शिळे, खरकटे अन्न, खाटकांकडून कापण्यात येणाऱ्या शेळ्या, मेंढी, कोंबड्या यांची आतडी, गावातील मृत जनावरे, कुत्री, डुकरे यांचे अवशेष अशा प्रकारची घाण येथील कचराभूमीवर टाकली जात आहे.येथील कचऱ्यापासून व अन्य घाणीपासून तयार होणारे जीवजंतू पाण्याच्या प्रवाहातून नदीपात्रात (जलाशयात) जात आहे. यामुळे जलाशयातील पाणी दूषित होऊन मानवी जीवनास अतिशय धोकादायक व अपायकारक आहे. 
नदीपात्रालगतची कचराभूमी तातडीने अन्यत्र हलविण्यात यावी, अन्यथा नगरपंचायत प्रशासन विरोधात आंदोलन केले जाईल.- विजय दुरगुडे, ग्रामस्थ
वाडा शहरालगत मोठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असतांनाही त्या नगरपंचायतीकडे वर्ग करण्यास येथील लोकप्रतिनिधींना अपयश आल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. हे येथील लोकप्रतिनिधींच्या असाह्यतेचे द्योतक आहे.- किरण थोरात, सामाजिक कार्यकर्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *