


प्राथमिक आरोग्य केंद्र, गोऱ्हे येथे कार्यरत असलेले शिपाई स्टाफ कर्मचारी व तालुक्यातील प्रतिभावंत चित्रकार श्री.कैलास लहांगे व परिचारिका फिलोमीना आरवडे हे आपली सेवाड्युटी बजावून घरी परतत असताना त्यांना दि.१५ एप्रिल,२०२० रोजी सकाळी ९:३०वा.च्या सुमारास गोऱ्हे फाटा (ता.वाडा) येथे २० ते २२ माणसे कुटुंबासमवेत घरगूती सामानासह अनवाणी चालत जाताना दिसली, न राहवता विचारणा केल्यानंतर ते सर्व लोक गाव-शेलार परिसर (ता.भिवंडी) येथे वीटभट्टीवर कामासाठी गेलेले व वाहनव्यवस्था नसल्यामुळे व इतर सर्वच पर्याय बंद झाल्यामुळे तेथून अंदाजे ७०-८०किमी साखरा, डोंगरीपाडा (ता.विक्रमगड) येथे अनवाणी पायी जात असल्याचे समजले.
त्यांच्यासोबत १० लहान मुले ही अनवाणी पायी जात असताना दिसली, त्या गरजूंना काही मदत करता येईल का? यासाठी श्री.कैलास लहांगे व परिचारिका फिलोमीना आरवडे यांनी तासभर त्यांच्या सोबतच थांबून प्रयत्न केले. वाडा पंचायत समिती सभापती, श्री.योगेश गवा यांना संपर्क करून या परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर श्री.योगेश गवा यांनी स्वतः व वाडा तहसीलदार डॉ.उद्धव कदम व कंचाड तलाठी श्री.दत्ता डोईफोडे यांच्यासमवेत गोऱ्हेफाटा (कंचाड) या ठिकाणी पोहोचून कर्तव्यदक्ष राहून सदर पायी जाणाऱ्या २०-२२ गरीब होतकरू मजूर-कुटुंबीयांना साखरे, विक्रमगड येथे त्यांच्या घरी पोच करण्यासाठी वाहनचालक श्री.किशोर पांडुरंग ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले व सामाजिक बांधिलकी जपली.
गोऱ्हे प्राथ.आरोग्य केंद्र स्टाफ श्री.कैलास लहांगे व परिचारिका फिलोमीना आरवडे यांनी या सर्व मजूर व कुटुंबबियांना आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी, खबरदारी घ्यायला सांगून त्यांना सद्याच्या कोरोना संक्रमण (COVID-19) रोगाविषयी जनजागृती केली तसेच त्यांना नजीकच्या साखरे येथील प्राथ.आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्यास सांगितले.
लॉकडाऊन काळात तालुक्यातील व तालुकाबाह्य नागरिकांसमोर येणाऱ्या अनेक बिकट प्रसंगांचे व समस्यांचे निरसन करून अनेक गरजूंना मदतीचा हात दिल्यामुळे एक सेवाभावी कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी, वाडा पं. स.सभापती श्री.योगेश गवा हे नेहमीच जनतेच्या चर्चेत असून त्यांच्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक व प्रशंसा होत आहे.